Israel-Hezbollah Ceasefire Deal: इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लासोबत (Hezbollah) युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. दोघांमधील हा करार बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून लागू झाला. मात्र, इस्रायलचे (Israe)पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी लेबनॉनमधील परिस्थितीवर युद्धविरामाचा कालावधी अवलंबून असल्यावर भर दिला. जो बाायडेन यांनी युद्धविराम कराराची घोषणा केल्यानंतर काही क्षणांतच इस्रायलच्या मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली. मात्र, त्याआधी इस्रायलने लेबनीजची राजधानी बेरूतमध्ये हवाई हल्ले करून सर्वांनाच चकित केले.
इस्रायली सुरक्षा दलांनी हा हल्ला अशावेळी केला आहे जेव्हा युद्धबंदीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती. सुमारे 14 महिन्यांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून बेरूत आणि त्याच्या दक्षिणी उपनगरातील रहिवाशांनी वारंवार इस्रायली हल्ले सहन केले आहेत. लेबनॉनमध्ये मंगळवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 42 लोक मारले गेले. हिजबुल्लाहने मंगळवारी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. ज्यामुळे देशाच्या उत्तर भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
इस्रायल-हिजबुल्लाह युद्धविराम हे 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या इस्रायल-हमासमधील अशांतता संपवण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल आहे. परंतु गाझामधील युद्धाशी ते अजूनही संबंधित नाही. हमासच्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली. सप्टेंबरमध्ये लेबनॉनमधील युद्ध परिस्थीती वाढली. त्यानंतर संपूर्ण जेशभरात हिंसाचार वाढलेला दिसला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे 14 महिने चाललेल्या युद्धात 44,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 104,000 हून अधिक जखमी झाले आहेत.
नेतान्याहू यांनी हा इशारा दिला
कराराला सहमती दर्शवताना नेतन्याहू यांनी काही बाबींवर भर दिला. ते म्हणाले की, 'अमेरिकेला पूर्ण समज देऊन आम्ही लष्करी कारवाईवर नियंत्रण राखू. पण जर हिजबुल्लाहने कराराचे उल्लंघन केले तर आम्ही हल्ला करू. तसेच त्यांनी सीमेजवळ दहशतवादी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न केल्यास हल्ला करू. त्यांच्याकडून रॉकेटचे प्रक्षेपण बोगदा खोदणे, रॉकेट वाहून नेले तर आम्ही पुन्हा हल्ला करू', असे नेतन्याहू म्हणाले.