Donald Trump | (Photo Credits: Facebook)

सोशल मीडियावर अत्यंत वादग्रस्त ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा ट्विटरवर एन्ट्री करण्याची शक्यता आहे. ट्विटरची (Twitter) मालकी असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांनी केलेल्या एका विधनामुळे ही चर्चा आणि शक्यता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरवर लावण्यात आलेले प्रतिबंध काहीसे चुकीचेच होते, असे मस्क यांनी म्हटले आहे. फायनान्शियल टाईम्सने आयोजित केलेल्या फ्यूचर ऑफ द कार इव्हेंट कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी ट्रम्प यांना ट्विटरवर बंदी म्हणजे एक वाईट निर्णय होता असे म्हटले. मस्क यांनी म्हटले की, मला वाटते की, डोनाल्ड टम्प यांच्यावर प्रतिबंध लावायला नको होते. ती एक चुक होती. त्यांच्या प्रतिबंदामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोणत्याही व्यक्तीवर कायमचे प्रतिबंध म्हणजे ट्विटरवरील लोकांचा विश्वास कमी होण्याचा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.

एलन मस्क यांनी पुढे असेही म्हटले की, जे ट्विट आक्षेपार्ह आणि वादग्रस्त आहेत ती हटविण्यात आली पाहीजेत किंवा अदृश्य करण्यात यावीत. एखाद्यावर मर्यादित काळासाठी बंदी ठिक आहे. परंतू, कायमस्वरुपाची बंदी हा उपाय नाही. दरम्यान, डोनाल्ड यांनीच एलन मस्क यांना ट्विटर खरेदी करण्यासाठी सूचवले किंवा प्रोत्साहीत केले असा आरोप होता. मात्र स्वत: एलन मस्क यांनीच काही दिवसांपूर्वी हा आरोप फेटाळून लावला आहे. मस्क यांनी ट्विट करत म्हटले आहे की, त्यांचा माजी राष्ट्राध्यक्ष (डोनाल्ड ट्रम्प) यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात कोणताही संपर्क नाही. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना हिंसा भडकवल्याच्या आरोपाखाली ट्विटरवरुन निलंबीत केलेआहे. एक प्रकारे त्यांची हकालपट्टीच केली आहे. कंपनीने म्हटले होते की, एक निर्णय जॅक डोर्सी यांच्या नेतृत्वाखालील होता. ट्विटरने मस्क यांच्या टप्पणीवर टिप्पणी करणे टाळले आहे. (हेही वाचा, Truth Social: माजी राष्ट्रपती Donald Trump यांनी लॉन्च केला स्वतःचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’)

एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. नुकतेच त्यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर इतक्या किमतीला खरेदी केले आहे. मस्क यांनी ट्विटरमध्ये 100% मालकी घेण्यासाठी ही रक्कम मोजली आहे. दुसऱ्या बाजूला एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवताच सीईओ पराग अग्रवाल यांची लवकरच गच्छंती होणार असे मानले जात आहे. वृत्तसंस्था रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार एलन मस्क यांनी नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चा शोध सुरु केला आहे. तो पूर्ण होताच अग्रवाल यांची सुट्टी केली जाऊ शकते.