China: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर Wuhan मधील शाळा मंगळवार पासून सुरु; प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी
Wuhan was under a 76-day shutdown earlier this year | File Image | (Photo Credits: ANI)

सध्या ज्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगामध्ये हाहाकार माजवला आहे, त्याचा उगम चीन (China) मधील वूहान (Wuhan) शहरामधून झाला होता. एकीकडे जग या विषाणूची लढत असताना, आता चीनने या विषाणूला नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोना विषाणूचे केंद्र असलेल्या वुहान सिटीमध्ये आता 1 सप्टेंबर, मंगळवारपासून शाळा (Schools) आणि बालवाडी उघडल्या जाणार आहेत. स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. वुहान शहरातील 2,842 शैक्षणिक संस्थांमधील सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे स्थानिक सरकारने शुक्रवारी जाहीर केले. याआधी वुहान विद्यापीठ सोमवारी पुन्हा सुरू झाले.

वूहानमध्ये तब्बल 8 महिन्यांनतर शाळा सुरु होणार आहेत. वुहानच्या स्थानिक प्रशासनाकडून असे सांगितले गेले आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणि बाहेर जाताना मास्क घालण्यासंबंधी तसेच शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक टाळण्याचा सल्ला दिला आहे. शाळांना रोग नियंत्रण उपकरणांचा साठा करण्यासाठी आणि शाळांना सराव आणि प्रशिक्षण सत्रे घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, ज्या परदेशी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळांकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही, अशांनी चीनला परत येऊ नये असे सांगितले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यामुळे या वर्षाच्या सुरूवातीस वूहान शहर 76 दिवसांच्या संपूर्ण लॉक डाउनमध्ये होते. 18 मेपासून शहरात कोविड-19 चे कोणतेही नवीन प्रकरण आढळले नाही. आतापर्यंत चीनमध्ये 85,000 पेक्षा जास्त कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्राणघातक विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 4,600 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. चीनमध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू हे एकट्या वूहान शहरामध्ये झाले आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरस दरम्यान, Pakistan मध्ये सुरु झाली शैक्षणिक संस्था उघडण्याची तयारी; सप्टेंबरच्या मध्यापासून सुरु होणार माध्यमिक शाळा, महाविद्यालये)

दरम्यान, वुहानमधून कोरोना विषाणूशी संबंधित माहिती लीक झाल्यामुळे जिनपिंग सरकारने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. वुहान मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रमुखांना प्रथम त्यांची शिक्षा मिळाली असून त्यांना तातडीने प्रभाग व पदावरून दूर करण्यात आले आहे. हे असे रुग्णालय आहे जिथे जगातील पहिल्या कोरोना संसर्गाची नोंद झाली आणि येथील काही डॉक्टरांनी हे संक्रमण किती धोकादायक आहे आणि ते कसे लपविले जात आहे हे उघड केले.