चीन फुटबॉल मैदान (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीन (China) हा जगातील पहिला असा देश होता, जिथे या शतकातील सर्वात मोठी महामारी कोरोना व्हायरसने (Coronavirus) जन्म घेतला. चीनच्या वुहानपासून सुरुवात झालेल्या या साथीच्या आजाराने मोठी दहशत निर्माण केली, हजारो लोक ठार झाले आणि चीनची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. त्यानंतर हा विषाणू चीनपासून संपूर्ण जगात पसरला व आता अमेरिका, इंग्लंड, इटली, स्पेन तसेच भारत यांसारखे अनेक देश या संकटाचा सामना करीत आहेत. मात्र हळू हळू चीनमधील परिस्थिती सुधारू लागली आहे. तिथले निर्बंध कमी होऊ लागले आहेत, व्यवसाय सुरु होत आहेत. अशात चीनमधील Guangzhou Evergrande ने देशात जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम (World's Biggest Football Stadium) बांधायला सुरुवात केली आहे.

Guangzhou Evergrande Taobao फुटबॉल क्लब हा एक व्यावसायिक चीनी फुटबॉल क्लब आहे, जो चीनी फुटबॉल असोसिएशनच्या परवान्याअंतर्गत चायनीज सुपर लीगमध्ये भाग घेतो. गुआंग्डोंगच्या गुआंगझोंग येथील हा संघ आहे. आता हाच संघ जगातील सर्वात मोठे फुटबॉल मैदान बांधत आहे, ज्याचे काम सुरु झाले आहे. कमळाच्या फुलाच्या आकारात बनत असलेल्या या स्टेडियमसाठी सुमारे 1.7 अब्ज डॉलर्स (13 हजार कोटी) इतका खर्च येणार आहे. 2022 पर्यंत या मैदानाचे काम पूर्ण होऊ शकते. रिअल इस्टेट समूह एव्हरग्रांडे अध्यक्ष झिया हायझन यांच्या मते, 'हे स्टेडियम, सिडनी ओपेरा हाऊस आणि दुबईतील बुर्ज खलिफा यांच्या तोडीस तोड असे एक जागतिक दर्जाचा लँडमार्क बनेल. तसेच फुटबॉल जगात चीनचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक असेल.'

या मैदानांत तब्बल 1 लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था असणार आहे. या मैदानासाठी, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेतून एव्हरग्रेडला आठ डिझाईन्स देण्यात आल्या होत्या. मात्र मूळचे शांघाय येथील अमेरिकन डिझायनर हसन सय्यद यांचे डिझाईन निश्चित केले गेले. या स्टेडियममध्ये 16 व्हीव्हीआयपी खासगी खोल्या बांधल्या जातील. तसेच यात फिफा क्षेत्र आणि अॅथलीट क्षेत्र देखील असेल. सध्या जगातील सर्वात मोठे स्टेडियम हे स्पॅनिश क्लब बार्सिलोनाचा कॅम्प नाउ स्टेडीयम आहे. यामध्ये सुमारे 99 हजार 354 लोक बसण्याची क्षमता आहे. (हेही वाचा: Coronavirus: आव्हान अजून संपले नाही!; चीनमध्ये पुन्हा 11 जण आढळले COVID-19 संक्रमित; कोरोना बाधितांचा आकड़ा वाढला)

दरम्यान, Guangzhou Evergrande ही चीनसह आशिया खंडातील सर्वात मोठ्या टीमपैकी एक आहे. 2010 मध्ये एव्हरग्रेन्डची मालकी घेतल्यानंतर टीमने आठ चीनी सुपर लीग आणि दोन आशियाई चॅम्पियन्स लीग जिंकल्या आहेत.