Popular Google Doodle Games च्या सीरीजमध्ये आज गूगलने तिसरं डुडल युजर्ससाठी आणलं आहे. सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे घरामध्ये अडकलेल्या युजर्सना थोडे विरंगुळ्याचे क्षण म्हणून सध्या गुगलकडून हे खास प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान यापूर्वी कोडिंग आणि क्रिकेटचा आस्वाद घेतल्यानंतर आजचा म्युझिकल डे आहे. काही सिंपल नोट्सचा वापर करून संगीत निर्माण करण्याच्या तुमच्यातील्ल क्रिएटीव्हिटीला या Fischinger मधून चालना मिळणार आहे.
गुगल कडून हा गेम पुन्हा लॉन्च करताना Google Doodleने दिलेल्या माहितीनुसार, घरी बसा आणि Fischinger (2017)चा आनंद लुटा. 2017 साली गूगलने Oskar Wilhelm Fischinger यांना त्यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल अर्पण केलं होतं. ते जर्मन अमेरिकन अॅनिमेटर, फिल्ममेकर, पेंटर होते. कम्प्युटर ग्राफिक्स आणि म्युझिकल व्हिडिओ चं अस्तित्त्व येण्याआधीच त्यांनी अॅब्स्ट्रॅक्ट म्युझिकल अॅनिमेशनची संकल्पना आणली होती. सध्या अनेक ठिकाणी कोव्हिड 19 मुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशामध्ये सार्या कुटुंबाचा एकत्र वेळ काही जुन्या आणि मजेशीर गोष्टींमध्ये घालवण्यासाठी गुगल डुडल गेम्सची सीरीज आणली आहे.
Fischinger कसा खेळतात?
गुगल डुडलवर अवघ्या एका क्लिकवर Fischinger खेळता येऊ शकतो. त्यासाठी गूगलच्या लोगोवर क्लिक करा. त्यानंतर म्युझिकल सिक्वेंसरचा एक इंटरफेस तुम्हांला दिसेल. त्यानंतर तुम्हांला वाद्य निवडायचा पर्याय मिळेल. त्यानंतर नोट्स अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हांला डायमंड्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिअल टाईममध्ये 16 बीट्सची एक मेलडी वाजायला लागेल. या संगीतरचनेसोबतच तुम्हांला स्क्रिनवर खास चित्र देखील बघायला मिळतील. यामध्ये तुम्ही सहज गाण्याचा टेम्पो, कीज आणि इतर इफेक्ट्स बदलू शकता.
सध्या लॉकडाऊन पाहता युजर्ससाठी गुगल 10 जुन्या खेळांची सीरीज घेऊन येणार आहे. यापूर्वी कोव्हिड योद्धांना सलाम करण्यासाठी, कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करण्यासाठी खास सीरीज गुगल डुडलच्या माध्यमातून सादर केली होती.