
सूर्यग्रहण (Solar Eclipse 2025) हा एक महत्वाची खगोलशास्त्रीय घटना असून, ज्यामध्ये चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान येतो, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही आणि सूर्य अंशतः किंवा पूर्णतः झाकला जातो. नुकतेच होळीच्या वेळी 2025 मधील पहिले चंद्रग्रहण झाले, त्यानंतर आता सर्वांच्या नजरा सूर्यग्रहणावर आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च 2025 रोजी म्हणजेच चैत्र महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) सूर्यग्रहण 29 मार्च रोजी दुपारी 2.20 वाजता सुरू होईल आणि हे ग्रहण संध्याकाळी 6.13 वाजता संपेल, जे सुमारे चार तास चालेल.
हे आंशिक सूर्यग्रहण असेल, म्हणजेच चंद्र सूर्याच्या फक्त एका भागाला व्यापेल. आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आर्क्टिकसह जगभरातील अनेक प्रदेश या घटनेचे साक्षीदार होतील. मात्र, उत्तर अमेरिकन प्रदेशात सूर्योदयासोबत ग्रहण दिसणार असल्याने या ठिकाणी ग्रहणाचे सर्वोत्तम दृश्य अनुभवायला मिळेल. दुर्दैवाने, 29 मार्च रोजी भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे याचा सुतक काळ देखील वैध राहणार नाही. (हेही वाचा: Hanuman Jayanti 2025 Date: हनुमान जयंती कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)
या ठिकाणी दिसेल सूर्यग्रहण-
उत्तर अमेरिका: न्यू यॉर्क (यूएसए), मॉन्ट्रियल (कॅनडा), हॅलिफॅक्स (कॅनडा), प्रेस्क आयल (यूएसए), ऑगस्टा (यूएसए), सेंट जॉन्स (कॅनडा), कुजुआक (कॅनडा)
युरोप: लंडन (यूके), पॅरिस (फ्रान्स), मद्रिद (स्पेन), बर्लिन (जर्मनी), ब्रुसेल्स (बेल्जियम), आम्सटरडॅम (नेदरलँड्स), डब्लिन (आयर्लंड), रेकजाविक (आइसलँड), ओस्लो (नॉर्वे), स्टॉकहोम (स्वीडन), हेलसिंकी (फिनलंड)
आफ्रिका: कॅसाब्लांका (मोरोक्को)
इतर ठिकाणे: नुउक (ग्रीनलँड), तोर्शवन (फॅरो बेटे), लॉन्गइअरब्येन (स्वालबार्ड, नॉर्वे), बेलुश्या गुबा (रशिया).
सूर्यग्रहण-
ज्यावेळी आकाशात चंद्र सूर्य आणि पृथ्वीचा संयोग होतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. यामुळे चंद्र पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश रोखतो. सूर्याचा किती भाग चंद्राने व्यापला आहे यावरून ग्रहणाचे प्रकार ठरवले जातात. सूर्यग्रहणांचे तीन प्रकार आहेत, पहिले- पूर्ण सूर्यग्रहण, दुसरे- आंशिक सूर्यग्रहण आणि तिसरे- कंकणाकृती सूर्यग्रहण. 29 मार्चचे आंशिक सूर्यग्रहण असेल, यासह वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी होईल व ते सूर्यग्रहण देखील आंशिक सूर्यग्रहण असेल.
दरम्यान, सूर्यग्रहण हा एक अद्भुत खगोलशास्त्रीय अनुभव आहे, जो वैज्ञानिक आणि सामान्य लोकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, सूर्यग्रहण पाहताना नेहमी प्रमाणित सौर फिल्टर असलेले चष्मे किंवा उपकरणे वापरावीत. सामान्य सनग्लासेस किंवा अनधिकृत उपकरणे वापरू नयेत, कारण त्यामुळे डोळ्यांना हानी होऊ शकते.