Poco चा नवा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये होणार लाँच; कंपनीने सोशल मीडियावर दिली माहिती
Poco (Photo Credit - Facebook)

पोकोच्या नवीन स्मार्टफोनची (Poco Smartphone) वाट पाहत असणाऱ्या यूजर्ससाठी चांगली बातमी आहे. कंपनी यावर्षी डिसेंबरमध्ये नवीन मध्यम रेंजचा स्मार्टफोन बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या उत्पादन विपणन व्यवस्थापकाच्या ट्विटनंतर पोकोच्या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चिंगविषयी चर्चा सुरू झाली. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, पोकोचा नवीन स्मार्टफोन या वर्षाच्या अखेरीस लाँच केला जाईल. प्राप्त माहितीनुसार, पोकोचा हा नवीन मध्यम-श्रेणी स्मार्टफोन रेडमी नोट 10 ची पुनर्ब्रांडेड आवृत्ती असू शकतो.

दरम्यान, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर कंपनीचा नवा फोन 15 डिसेंबरपूर्वी बाजारात येऊ शकेल. हे या फोनचं जागतिक लाँचिंग असणार आहे. पोको हा नवीन फोन भारतात लॉन्च करणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. (हेही वाचा -Portronics ने भारतात लॉन्च केले Bluetooth Receiver आणि Transmitter Adaptor, जाणून घ्या खासियत)

काही दिवसांपूर्वी पोकोचा फोन मॉडेल क्रमांक M2010J19CG रशियाच्या प्रमाणपत्र वेबसाइट ईईसी वर दिसला होता. हा फोन रेडमी नोट 10 सीरीजची पुनर्ब्रांडेड आवृत्ती आहे. तसेच अलीकडेच, रेडमी नोट 10 4G मॉडेल क्रमांक M2010J19CG चीनच्या 3C प्रमाणपत्र वेबसाइटवर आढळून आला होता. असं म्हटलं जात आहे, जागतिक बाजारापेठेत मॉडल नंबर M2010J19CG फोन पोको फोन म्हणून लाँच करण्यात येईल.

याशिवाय कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला Poco C3 स्मार्टफोन बाजारात आणला होता. हा फोन जूनमध्ये मलेशियात लॉन्च झालेल्या रेडमी 9 C प्रमाणेच आहे. त्याचप्रमाणे कंपनीने युरोपमध्ये लाँच केलेला पोको X3 NFC भारतात पोको X3 नावाने लाँच केला आहे.