सार्वजनिक परिवहन सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची एक कॉमन तक्रार असते. ती म्हणजे वेळेची. बसेस, रेल्वे कधीच वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांच्या या त्रासासाठी गुगल मॅपने एक चांगला पर्याय उपलब्ध केला आहे. देशातील प्रमुख 10 शहरांमध्ये गुगल मॅप्सवर आता बसच्या प्रवासासाठी लागणारा कालावधी सांगण्यात येईल. इतकंच नाही तर भारतीय रेल्वेची स्थितीही या मॅपवर दाखवण्यात येईल.
या सुविधांबरोबरच युजर्सला यात ऑटो रिक्षा आणि इतर सार्वजनिक परिवहन पर्याय उपलब्ध होतील. यामुळे युजर्सला सार्वजनिक परिवहन मंडळाच्या बस, रेल्वेतून प्रवास करताना प्रवासाची आखणी करता येईल.
या नव्या फिचरच्या माध्यमातून युजर्सला दिल्ली, बंगलोर, मुंबई, हैद्राबाद, पुणे, लखनऊ, चेन्नई, म्हैसूर, कोयंबटूर आणि सूरत या भागात बस प्रवास करताना लाईव्ह वेळ कळेल. गुगल मॅप युजर्स बस ट्रॅव्हल टाईम, लाईव्ह ट्रॅफिक पाहू शकतात. यामुळे बस प्रवास करताना होणारा विलंब, गैरसोय टाळता येईल. पूर्वी पासून असलेल्या या फिचरला 'Where is My Train' सह अपडेट करण्यात आले आहे. तसंच गुगल मॅप्सवर आता पब्लिक ट्रान्सपोर्टची माहिती मिळेल.