Fastest 5G Download Speed: जगात 5 जी नेटवर्क स्पीडच्या बाबतीत सौदी अरेबियाने मारली बाजी; 3 सेकंदात डाउनलोड होतो 1 GB चित्रपट
5G Mobile Network | (Photo courtesy: archived, edited, representative image)

आपल्याकडे स्मार्टफोन आहे, परंतु नेटचा स्पीड नाही ही भारतामध्ये नेहमीची समस्या आहे. यामुळे व्हिडिओ आणि फोटोज डाउनलोड करण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. भारतासह अनेक देश असे आहेत की जिथे काही ठिकाणी 3G नेटवर्कही व्यवस्थित मिळत नाही. दुसरीकडे जगात असे काही देश आहेत जिथे 5G नेटवर्क अगदी व्यवस्थित सुरु आहे. आगामी काळात अनेक देश 5G ची ट्रायल सुरू करणार आहेत. दरम्यान, इंटरनेट स्पीडची चाचणी घेणार्‍या ओपनसिग्नल या कंपनीने 5G नेटवर्कशी संबंधित अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, जगातील सर्वात वेगवान 5G डाउनलोड स्पीडच्या (Fastest 5G Download Speed) बाबतीत सौदी अरेबिया (Saudi Arabia) ने बाजी मारली आहे. यामध्ये दक्षिण कोरिया दुसर्‍या क्रमांकावर आहे.

ओपनसिग्नलच्या मते, सौदी अरेबियामधील 5G ​​नेटवर्कवर सरासरी डाउनलोड वेग 377.2 एमबीपीएस होता. दक्षिण कोरियामध्ये 5G नेटवर्कवर सरासरी डाउनलोड वेग 336.1 एमबीपीएस होता. या अहवालात 1 जुलै ते 28 सप्टेंबर या कालावधीत 15 देशातील 5G स्पीडशी संबंधित डेटाचा समावेश आहे. सौदी अरेबियामधील 377.2 एमबीपीएस म्हणजे 1 सेकंदात 377.2 एमबी डेटा डाउनलोड केला जाऊ शकतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, 1 जीबी चित्रपट डाउनलोड करण्यास 3 सेकंदापेक्षा कमी कालावधी लागू शकतो. अहवालानुसार, सौदी अरेबियामध्ये 4G डाउनलोड स्पीड 30.1 एमबीपीएस आहे, जे 5G पेक्षा 12.5 पट कमी आहे. (हेही वाचा: लवकरच Reliance Jio बाजारात घेऊन येणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; किंमत फक्त 2500 ते 3000 रुपये)

जाणून घ्या जगातील सर्वात जास्त 5G स्पीड असणाऱ्या देशांची यादी –

 1. सौदी अरेबिया
 2. दक्षिण कोरिया
 3. ऑस्ट्रेलिया
 4. तैवान
 5. स्पेन
 6. कुवैत
 7. कॅनडा
 8. इटली
 9. थायलंड
 10. स्वित्झर्लंड
 11. यूके
 12. हाँगकाँग
 13. जर्मनी
 14. नेदरलँड्स
 15. यूएसए

याची तुलना भारताच्या 4G स्पीडशी केल्यास, ट्राय अहवालानुसार रिलायन्स जिओची जास्तीत जास्त 4G डाउनलोड स्पीड 33.3 एमबीपीएस झाली आहे. म्हणजेच सौदी अरेबियाचा 5G डाउनलोड वेग आपल्या इथल्या 4 जी स्पीडपेक्षा 11 पट अधिक वेगवान आहे. 5G नेटवर्क दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये झपाट्याने विस्तारत आहे. दक्षिण कोरियामधील 5G नेटवर्कशी जोडले राहण्यासाठी वापरकर्त्यांनी 22.5 टक्के अधिक पैसा खर्च केला आहे. मागील अहवालात हा आकडा 20.7 टक्के होता.