Apple (Image: PTI)

Apple Store Online आजपासून भारतात सुरू झाले आहे. यामुळे ग्राहकांना Apple उत्पादनांची संपूर्ण रेंज आणि देशभरात प्रथमच थेट सपोर्ट, मदत मिळणार आहे. आयफोन बनवणारी ही कंपनी आतापर्यंत भारतात विक्रीसाठी अधिकृत असलेल्या किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित होती. म्हणजेच थर्ड पार्टीकडून ग्राहक ही उत्पादने घेत होते परंतु आता Apple शी ग्राहक थेट व्यवहार करू शकतील. Apple स्टोअर ऑनलाईनच्या मदतीने ग्राहक Apple च्या ट्रेड-इन (जुनी उत्पादने देऊन नवीन खरेदी करणे) व आर्थिक पर्यायांचा फायदा घेण्यास सक्षम असतील, ज्यामुळे आयफोन आणि मॅक सारखी कंपनीची महत्वाची उत्पादने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होतील.

Apple Store Online वरून नवीन iPhone, iPad, Mac आणि Apple Watch सारखी उत्पादने खरेदी केली जाऊ शकतात. अलीकडेच सुरू झालेली Apple Watch Series 6, Watch SE, iPad Air (4th Gen) आणि iPad (8th Gen) देखील इथे खरेदी करता येईल. त्यांचे वितरण ऑक्टोबरच्या सुरूवातीस सुरू होईल. दरम्यान, विद्यार्थ्यांना आयपॅडसारख्या उत्पादनांवरील शैक्षणिक सवलतीचा लाभ घेता येणार आहे. Apple ने म्हटले आहे की ऑनलाइन स्टोअरद्वारे केलेल्या सर्व ऑर्डर 24 ते 72 तासांच्या कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी दरम्यान पोहोचवल्या जाती, ज्यासाठी कंपनीने ब्लूडार्टशी करार केला आहे. (हेही वाचा: 'जिओ'ने सादर केला पोस्टपेड प्लॅन; Netflix, Amazon Prime, Disney Plus Hotstar मिळणार मोफत, जाणून घ्या सविस्तर)

कंपनीला देशांतर्गत बाजारात फार मोठी घट पाहावी लागली आहे. या दरम्यान, Apple ऑनलाइन स्टोअरला जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजारात आणणे, हे फायद्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे कंपनीला Apple केअर प्लस सारख्या हॉलमार्क सेवा भारतात आणता येतील

Apple स्टोअर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड ईएमआय, यूपीआय, रुपे, नेट बँकिंगसह ऑनलाइन पेमेंटचे अनेक पर्याय ऑफर करते. कंपनी, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरुन केलेल्या खरेदीवर कार्ट व्हॅल्यूचे 6 टक्के (10 हजार रुपयांपर्यंत) कॅशबॅक देखील देत आहे. 20,900 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या कार्ट व्हॅल्यूवर कॅशबॅक देण्यात येईल आणि ही ऑफर 16 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहील.