PM Narendra Modi and Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge. (Photo Credit: PIB)

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर (China Apps) बंदी घातली होती. त्यानंतर आता देशात स्वदेशीची लाट पसरली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी ‘आत्मनिर्भर भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज’ (Atmnirbhar Bharat App Innovation Challenge) लॉन्च केले आहे. देशातील टेक आणि स्टार्टअप समुदायाने यात सहभागी व्हावे व देशाला आत्मनिर्भर अ‍ॅप इकोसिस्टम म्हणून तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी लिंकडिन (Linkedin) वरील टेक प्रोफेशनल्सना संबोधित करताना हे सांगितले.

पीएम मोदी यांनी या आव्हानाद्वारे, भारतीयांनी स्वदेशी अ‍ॅप्स तयार करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'आज संपूर्ण देश आत्मनिर्भर भारत होण्याच्या दिशेने काम करत आहे. अशात देशातील स्टार्ट-अप आणि टेक इकोसिस्टमला इनोव्हेट, डेव्हलप आणि प्रमोट करण्याची ही योग्य वेळ आहे. या स्टार्टअप्सचे कठोर परिश्रम आणि त्यांच्या प्रतिभेच्या मार्गदर्शनाने आम्ही, सध्याच्या बाजाराच्या गरजा भागवणारे अ‍ॅप तयार करण्यात यशस्वी होऊ शकतो आणि जगाशी स्पर्धा करू शकतो.’

आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंजचे नियंत्रण इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Ministry of Electronics and IT) करेल. यासह, अटल इनोव्हेशन मिशन (Atal Innovation Mission) देखील सुरू राहील. यावर दोन प्रकारे काम केले जाईल. प्रथम विद्यमान अनुप्रयोगांना प्रोत्साहन देणे आणि नवीन अनुप्रयोग विकसित करणे हे आहे. या सर्वांच्या व्यतिरिक्त, केंद्र सरकार विद्यमान अ‍ॅप्सचा प्रचार करण्यासाठी सर्व प्लॅटफॉर्मवर विद्यमान अ‍ॅप्सची जाहिरात करण्यात मदत करेल. त्यात ई-लर्निंग, घरातून काम (Work From Home), गेमिंग, व्यवसाय, करमणूक, कार्यालयीन उपयुक्तता (Office Utilities) आणि सोशल नेटवर्किंग असे प्लॅटफॉर्म असतील.

सरकारने यासाठी रोख पुरस्कार जाहीर केले आहेत. यात पहिल्या स्थानावरील अ‍ॅपला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या अ‍ॅप्ससाठी रोख पुरस्कार म्हणून, अनुक्रमे 15 आणि 10 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी एक उप श्रेणी असेल ज्याअंतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख व 2 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.