आयपीएल 2018 विजेती टीम (Photo: @IPL/Twitter)

IPL 2019 Auction : शेवटी सर्वांनाच उत्सुकता असलेल्या 2019 च्या आयपीएल (Indian Premier League)च्या लिलावाची घोषणा झाली आहे. येत्या 18 डिसेंबरला जयपूर येथे आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. बीसीसीआय (Board of Control for Cricket in India)ने  सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या लिलावात एकूण 70 खेळाडूंचा लिलाव होणार आहे, पैकी 50 खेळाडू हे भारतीय असतील तर 20 खेळाडू परदेशी असणार आहेत. हे आयपीएलचे 12 वे वर्ष असणार आहे.

नुकतेच आयपीएलच्या टीम्सनी संघात कायम ठेवलेल्या आणि संघातून काढून टाकण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यापैकी दिल्लीच्या टीमने 13 खेळाडू संघातून काढून टाकले आहेत, तर चेन्नईने सर्वात कमी म्हणजे 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्व संघांनी मिळून 71 खेळाडूंना काढून टाकले आहे. या लिलावात उर्वरीत खेळाडूंवर तब्बल 145 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावली जाणार आहे.

आयपीएलमधून बाहेर काढण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये युवराज सिंघ, गौतम गंभीर, मागच्या वर्षीचा राजस्थानचा सर्वात महागडा खेळाडू जयदेव उनाडकट, ऋद्धीमान सहा, जेपी ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजुर रहमान अशा काही महत्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे.

यंदा 2019 च्या  लोकसभा निवडणूक आणि आयपीएल एकाचवेळी आले आहेत. त्यामुळे आयपीएलचे सर्व सामने अथवा काही सामने भारताबाहेर खेळवले जाण्याची शक्यता आहे. 2014 साली अर्धी आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली आणि उरलेले आयपीएलचे सामने पुन्हा भारतात खेळवले गेले. 2009 साली संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती.