
Lucknow Super Giants vs Punjab Kings IPL 2025: टाटा आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 13 वा सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. पंजाबचा हा दुसरा विजय होता. ज्यामुळे ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले. तर लखनौला दुसरा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 52 धावा करून कर्णधारपदाचा विक्रम केला. यादरम्यान त्याने भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग(Virender Sehwag)ला मागे टाकले.
श्रेयसने कर्णधारपदाच्या मोठ्या विक्रमात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. आयपीएल विजयांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या यादीत श्रेयसने सेहवागला मागे टाकले. या विक्रमात श्रेयसचे कर्णधार म्हणून हे 11 वे अर्धशतक होते. सामन्याच्या विजयात सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत श्रेयस आता सातव्या स्थानावर आहे. तर विराट कोहली या यादीत आघाडीवर आहे. 24 वेळा कर्णधारपद भूषवताना त्याने अर्धशतके झळकावली आहेत.
श्रेयस अय्यरने गुजरात टायटन्सविरुद्ध 97 धावांची नाबाद खेळी केली होती. जो पंजाब किंग्जचा हंगामातील पहिला विजय होता. आयपीएल हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पंजाब किंग्जने दोन विजय नोंदवण्याची ही चौथी वेळ आहे. 2025 पूर्वी, पंजाबने 2014, 2017 आणि 2023 मध्ये पहिले दोन सामने जिंकले होते. त्यापैकी 2014 मध्ये ते अंतिम फेरीतही पोहोचले होते. परंतु अंतिम सामन्यात कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला.