
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचे विजयाचे खाते काल चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (RR vs CSK) उघडले. या हंगामात सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर, राजस्थान संघाने गुवाहाटी मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा 6 धावांनी पराभव केला आणि हंगामातील पहिला विजय नोंदवला. राजस्थान संघाने विजयाची चव चाखली असली तरी, या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने राजस्थान संघाचा कर्णधार रियान परागवर मोठा दंड ठोठावला आहे. आयपीएल आयोजकांनी रियान परागला (Riyan Parag) स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राजस्थान रॉयल्स संघ चेन्नईविरुद्ध निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण करू शकला नाही. यामुळे राजस्थान संघ आणि संघाच्या कर्णधारावर हा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल 2025 मध्ये कोणत्याही संघाला स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावण्यात आलेला हा दुसरा दंड आहे. याआधी शनिवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही आयपीएल आयोजकांनी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या निर्धारित वेळेत त्यांच्या संघाला 20 वे षटकही सुरू करता आले नाही. स्लो ओव्हर रेटसाठी पहिल्या गुन्ह्यावर संघाच्या खेळाडूंच्या मॅच फीवर आता परिणाम होणार नाही.
आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे की, " 30 मार्च 2025 रोजी गुवाहाटी येथील एसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल 2025 च्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागच्या संघाने स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, त्या अंतर्गत त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने, रियान परागला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे."