श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) मोठा सट्टा खेळला आहे. दोन वेळा आयपीएल चॅम्पियन फ्रँचायझीने 12.25 कोटींची मोठी बोली लावून त्याचा संघात समावेश केला आहे. गेल्या मोसमापर्यंत तो दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) भाग होता आणि रिषभ पंतच्या आधी त्याने संघाचे यशस्वी नेतृत्वही केले होते. मात्र, त्याच्या दुखापतीनंतर संघाने पंतला कर्णधार बनवले आणि तो परतल्यावर त्याला पंतच्या नेतृत्वात खेळावे लागले. आता KKR संघाचा पुढील कर्णधार (KKR New Captain) बनण्यासाठी तो एक दावेदार असेल. अय्यरपूर्वी फ्रँचायझीने त्यांचा तडाखेबाज ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 7.25 कोटी रुपयांत पुन्हा खरेदी केले होते. त्यामुळे आता अय्यरचा समावेश करून कोलकाताच्या कर्णधारचा प्रश्न सुटला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी अहमदाबादमध्ये तिसरा आणि शेवटचा वनडे खेळला गेला. या सामन्यात श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि या फलंदाजाने 80 धावांची शानदार खेळी खेळली. आता आज त्याला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2022 खेळाडूंच्या लिलावात विकत घेतले आहे. त्यासाठी काही संघांनी जोरदार बोली लावली. श्रेयस अय्यर हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तो आयपीएलमध्येही खूप यशस्वी ठरला आहे. अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघ अय्यरला कायम ठेवेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही आणि आता तो एका नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहे.

श्रेयस अय्यरला आयपीएलच्या पहिल्या सत्रात उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर, आयपीएल 2019 लिलावापूर्वीच त्याला दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले होते. तर 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने अय्यरकडे कर्णधारपद सोपवले होते. त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने प्रभावी कामगिरी केली. श्रेयस अय्यरने आतापर्यंत 87 आयपीएल सामन्यांमध्ये 2375 धावा केल्या असून, या स्पर्धेत त्याने 16 अर्धशतके केली आहेत.