IPL 2022, DC vs RCB: आयपीएलच्या (IPL) 27 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 16 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स संघाने 20 षटकांत 5 बाद 189 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दिल्ली निर्धारित 20 षटकांत 173 धावाच करू शकली आणि संघाला पाच सामन्यातील तिसरा पराभव पत्करावा लागला. आरसीबीच्या विजयात दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सर्वाधिक नाबाद 66 धावा करून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर गोलंदाजांनी बॉलने धुमाकूळ घातला आणि नियमित अंतराने विकेट घेत दिल्लीला पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. बेंगलोरकडून जोश हेझलवुडने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने दोन आणि वानिंदू हसरंगाने एक गडी बाद केला. दुसरीकडे, दिल्लीसाठी डेविड वॉर्नरने 66 धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋषभ पंतने 34 धावा केल्या. (IPL 2022: रवी शास्त्री यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले - IPL ला मिळणार नवा चॅम्पियन; RCB च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर केले मोठे विधान)
सामन्याबद्दल बोलायचे तर आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरच्या सलामी जोडीने दिल्लीला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 50 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली असताना सिराजच्या गोलंदाजीवर शॉ स्वस्तात बाद झाला. यांनतर दिल्लीसाठी पदार्पण केलेला नवोदित मिचेल मार्शने सलामीवीर वॉर्नरसह संघाचा डाव सावरला. वॉर्नर 38 चेंडूत 66 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला, तर पहिला सामना खेळणाऱ्या मिचेल मार्शच्या अतिशय संथ खेळीचा अंत रनआऊटने झाला. मार्शने 24 चेंडूत 14 धावा केल्या. हेझलवूडने आपल्या डावातील तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोवमन पॉवेलला खाते न उघडता आल्या पावली माघारी धाडलं. हेझलवूडने आपल्या तिसऱ्या षटकातील पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेत सामन्यातील बेंगलोरची स्थिती मजबूत केली. पहिल्या चेंडूवर पॉवेल, तर अखेरच्या चेंडूवर ललित यादवने आपली विकेट गमावली. यानंतर कर्णधार ऋषभ पंत बाद होताच संघाच्या विजयच्या आशाही मावळल्या.
तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजीला बोलावले. रॉयल चॅलेंजर्सची सुरूवात खराब झाली असली तरी मॅक्सवेल आणि कार्तिकची अर्धशतकी खेळी लक्षवेधी ठरली. आरसीबीतर्फे दिनेश कार्तिकने नाबाद 66 आणि ग्लेन मॅक्सवेलने 55 धावा केल्या. कार्तिक आणि शाहबाझ अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी 52 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. बेंगलोरचे आघाडीचे तीनही फलंदाज बॅटने फारसे योगदान देण्यात अपयशी ठरले. फाफ डु प्लेसिस 8 तर विराट कोहली 12 धावांत रनआऊट झाला. एशिअवय अनुज रावत खातेही उघडू शकला नाही.