PBKS vs RCB IPL 2021: पंजाबच्या Ravi Bishnoi ने अफलातून कॅच घेत सर्वांना केलं थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल वाहवाह!
रवि बिश्नोईचा डायविंग कॅच (Photo Credit: Twitter)

PBKS vs RCB IPL 2021 Match 26: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या (IPL) 26व्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) 34 धावांनी जोरदार विजय मिळवला. कर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू हरप्रीत ब्रार संघाच्या विजयाचे नायक ठरले. राहुलने बॅटिंगने 91 धावांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाला 179 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली तर ब्रारने आरसीबीच्या आघाडीच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. हरप्रीतने 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात पंजाबच्या रवि बिश्नोईने (Ravi Bishnoi) पुन्हा एकदा अफलातून झेल घेत सर्वांना थक्क केले. आरसीबीच्या (RCB) डावातील अखेरच्या क्षणी शेवटच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर बिश्नोईने हर्षल पटेलचा (Harshal Patel) हवेत सूर मारून कॅच पकडला. (RCB vs PBKS IPL 2021 Match 26: राहुलची धमाकेदार खेळी, Harpreet Brar ची दमदार गोलंदाजी; पंजाबने लावला ‘विराटसेने’च्या विजयी घोडदौडवर ब्रेक)

पंजाबसाठी रिले मेरीडिथ डावाची अखेरची ओव्हर टाकण्यासाठी आला पण ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर काईल जेमीसनने मारलेला जोरदार फटका त्याच्या पायाला लागला ज्याने त्याला मैदान सोडून बाहेर जाण्यास भाग पाडले. यानंतर मोहम्मद शमी उर्वरित चेंडू टाकण्यासाठी आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर पटेलने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू उंच हवेत मारला. यावर बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करणाऱ्या बिश्नोईने हवे डायव्ह करत जबरदस्त कॅच पकडला. आयपीएलच्या या हंगामात हा झेल सर्वोत्कृष्ट कॅच म्हणून ओळखला जात आहे. बिश्नोईने पकडलेला कॅच पाहून सर्व पंजाब खेळाडूंनी मैदानात जल्लोष साजरा केला. यासह शमीने आयपीएलचा पर्पल कॅप धारक पटेलला 31 धावांवर तंबूत धाडलं. यापूर्वी देखील बिश्नोईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सुनील नारायणचा अप्रतिम डायविंग कॅच घेत सर्वांना थक्क केलं होतं.

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर बिश्नोईने पटेलचा कॅच वगळता 17 धावा देत 2 विकेट्स घेऊन हरप्रीत ब्रारला उत्तम साथ दिली. ब्रारने आपल्या 4 ओव्हर्समध्ये 19 धावनावर 3 विकेट्स घेतल्या. ब्रारने 11 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहली, त्यानंतर लगेच पुढच्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर आऊट केल. हरप्रीतची हॅटट्रिक हुकली तरी त्याने पुढील ओव्हरमध्ये एबी डिव्हिलियर्सला 3 धावांवर आऊट करत आरसीबीला तिसरा मोठा धक्का दिला. दरम्यान, पंजाबचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय असून बेंगलोरचा दुसरा पराभव ठरला आहे.