IPL 2021 Auction: चेतेश्वर पुजारा याचं 7 वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक, टाळ्यांचा कडकडाट करत केले अभिवादन, पहा Video
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-Getty Images)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premire League)2021 लिलावात टीम इंडियाचा (Team India) 'टेस्ट स्पेशलिस्ट' चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासाठी 7 वर्षानंतर एका फ्रँचायझीने बोली लावली आणि अखेरीस उपस्थित संघाने टाळ्यांच्या  कडकडाट करत अभिवादन केले. 'टेस्ट स्पेशलिस्ट'च्या टॅगमुळे मागील सात वर्षांपासून आयपीएलचा भाग न होऊ शकलेल्या पुजाराला अखेर आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. आगामी 14व्या हंगामासाठी आयपीएलच्या (IPL) विजेतेपदाचा तीन वेळा मान मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पुजाराचा 50 लाखाच्या बेस प्राईसवर आपल्या ताफ्यात समावेश केला. भारतीय फलंदाज पुजारा अखेर 2014 मध्ये आयपीएलमध्ये झळकला होता जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) संघाने त्याला बेस किंमतीवर खरेदी केले होते. त्या मोसमात पुजाराने 20.53 च्या सरासरीने आणि 39.74 च्या स्ट्राइक रेटने 390 धावा केल्या होत्या मात्र, त्यानंतर पुजाराला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. (IPL 2021 Auction: अनकॅप्ड K Gowtham याच्यासाठी या संघाने लावली तब्बल 9.25 कोटींची बोली, रचला इतिहास)

गुरुवारी चेन्नई येथे सुरु असलेल्या 14व्या आयपीएल हंगामाच्या लिलाव दरम्यान पुजाराचे नाव समोर आले तेव्हा महेंद्र सिंह धोनीच्या संघाने त्याला 50 लाखांच्या बेस प्राईसवर संघात सामील केले. त्यानंतर लिलाव कक्षात उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून पुजाराचे अभिवादन केले. पुजाराने आजवर आयपीएलमध्ये 30 सामन्यात 100च्या स्ट्राइक रेटने 390 धावा केल्या आहेत. दरम्यान, पुजारा सध्या इंग्लंडविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या डे-नाईट कसोटीची तयारी करीत आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दोन्ही संघ पहिल्यांदा पिंक-बॉल कसोटी सामन्यात आमने-सामने येतील. सध्या दोन्ही संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आगामी सर्व सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, आयपीएलच्या 14व्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिस महागडा क्रिकेटपटू ठरला. राजस्थान रॉयल्सने मॉरिससाठी 16.25 कोटी रुपये मोजले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनला 15 कोटी रुपयात आपल्या गोट्यात सामील केले आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची मागणीही कमी झाली नाही. आरसीबीने त्याचा 14 कोटी 25 लाखात संघात समावेश केला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये कर्नाटकचा कृष्णप्पा गौतम महागडा ठरला. सीएसकेने गौतमसाठी 9.25 कोटी रुपये मोजले.