ICC Champions Trophy 2025 (Photo credit: X @therealpcb)

आयसीसीने (ICC) अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली आहे. आता टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जावे लागणार नाही. भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, आयसीसी पाकिस्तानला कोणतेही अतिरिक्त पैसे किंवा नुकसानभरपाई देणार नाही. हायब्रीड मॉडेलच्या बदल्यात कोट्यवधी रुपये मिळतील, अशी पाकिस्तान बोर्डाची अपेक्षा होती, मात्र तसे होताना दिसत नाही.

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 10 सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. साखळी फेरीतील भारताचे तिन्ही सामने दुबईत होणार आहेत. भारताच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त, स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील दुबईमध्ये होणार आहेत. जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तर तो सामना दुबईत होणार आहे. म्हणजे भारत-पाकिस्तान फायनल झाली तर यजमान देशाला दुबईला खेळायला जावे लागेल. जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली नाही तर अंतिम सामना लाहोरमध्ये होणार आहे.

दुसरीकडे, 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारत दौरा करणार नाही. टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्यात असणार आहे. पाकिस्तानने त्यांचे सामने कोलंबोमध्ये खेळवण्याची मागणी केली होती. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्ये होणार आहे. पण हे फक्त लीग सामन्यांसाठी आहे. 2026 च्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ बाद फेरीत पोहोचले तर पाकिस्तानला सामना खेळण्यासाठी भारतात यावे लागेल. यासह आयसीसीने 2027 मध्ये आयसीसी महिला करंडक देण्याचे मान्य केले आहे. (हेही वाचा: ICC Test Batting Rankings: हॅरी ब्रूक कसोटीत जागतिक क्रमवारीत नंबर-1 फलंदाज बनला, आयसीसीच्या ऑलटाईम क्रमवारीत अनेक दिग्गजांना टाकले मागे; सचिनची केली बरोबरी)

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोणत्याही किंमतीत हायब्रीड मॉडेलसाठी तयार नसल्याची ओरड होत होती. टीम इंडियाला पाकिस्तानात का यायचे नाही, याचे बीसीसीआयकडून लेखी उत्तर मागितले जात होते. पण अखेर निकाल बीसीसीआयच्या बाजूने लागला आहे. आयसीसीच्या या बैठकीनंतर लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि समाप्ती तारीख आली आहे परंतु वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.