MS Dhoni (Photo Credit - Twitter)

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची (IPL 2024) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयपीएलचा 17वा हंगाम उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या गल्लीबोळात फक्त आयपीएलचीच चर्चा होत आहे. गतविजेता चेन्नई संघ यंदाच्या मोसमात आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत संघाची मोठी जबाबदारी एमएस धोनीच्या खांद्यावर असेल. एमएस धोनीला आयपीएलच्या आगामी हंगामातही आपल्या फलंदाजीने छाप सोडायची आहे.

आरसीबीविरुद्ध एमएस धोनीची अशी आहे सरासरी 

एमएस धोनीला आरसीबीविरुद्ध फलंदाजी करायला आवडते. एमएस धोनीने आत्तापर्यंत आरसीबी विरुद्धच्या 34 सामन्यांमध्ये जवळपास 40 च्या सरासरीने आणि 140.77 च्या स्ट्राइक रेटने 839 धावा केल्या आहेत. दरम्यान, एमएस धोनीनेही आरसीबीविरुद्ध 4 अर्धशतके झळकावली आहेत. डेव्हिड वॉर्नर (861) नंतर एमएस धोनी आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.

आरसीबीच्या स्टार गोलंदाजांविरुद्ध एमएस धोनीची आकडेवारी

आयपीएलमध्ये मोहम्मद सिराजविरुद्ध एमएस धोनीने 28 चेंडूंचा सामना केला होता. या कालावधीत एमएस धोनीच्या बॅटमधून 51 धावा झाल्या आहेत. दरम्यान, मोहम्मद सिराजला एमएस धोनीची विकेट घेता आलेली नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलविरुद्ध एमएस धोनीने 32 चेंडूत 25 धावा केल्या. या काळात हर्षल पटेलने एमएस धोनीला दोनदा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. लेगस्पिनर कर्ण शर्माविरुद्ध एमएस धोनीने 29 चेंडूत 37 धावा केल्या आहेत. दरम्यान, एमएस धोनी एकदाही आऊट झालेला नाही.

एमएस धोनी करू शकतो हे महत्त्वाचे विक्रम 

आयपीएलमध्ये, एमएस धोनीने आतापर्यंत 244 सामन्यांमध्ये (चॅम्पियन्स लीगसह) सीएसकेसाठी 38.72 च्या सरासरीने आणि 137.8 च्या स्ट्राइक रेटने 4,957 धावा केल्या आहेत. सीएसकेचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैनानंतर 5000 धावा करणारा एमएस धोनी दुसरा फलंदाज ठरणार आहे. ख्रिस गेल, रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्सनंतर एमएस धोनी आयपीएलमध्ये 250 षटकार मारणारा चौथा फलंदाज बनू शकतो. एमएस धोनीने आपल्या टी-20 कारकिर्दीत 7,271 धावा केल्या आहेत. आगामी मोसमात एमएस धोनीकडे 7,500 धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी असेल.