CSK vs RCB IPL 2021 Match 19: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) विजयरथ रोखण्यात अखेर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यशस्वी झाले आहेत. चेन्नईने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या (IPL) 19व्या सामन्यात बेंगलोर विरोधात 69 धावांनी जोरदार विजय मिळवला. सीएसकेने (CSK) दिलेल्या धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आरसीबी (RCB) 20 ओव्हरमध्ये 122 धावाच करू शकले परिणामी त्यांना यंदाच्या मोसमातील पापहिल्या पराभवाला समोर जावे लागले. आरसीबीसाठी देवदत्त पडिक्क्लने 34 आणि ग्लेन मॅक्सवेलने 22 धावा केल्या तर तर काईल जेमीसनने 16 धावा केल्या आणि मोहम्मद सिराज 12 धावा करून नाबाद राहिला. अन्य फलंदाज दहाचा आकडा देखील स्पर्श करू शकले नाही. दुसरीकडे, चेन्नईसाठी रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच इमरान ताहीरला 2 तर सॅम कुरन व शार्दूल ठाकूरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. जडेजा चेन्नईच्या विजयाचा खरा नायक ठरला. (CSK vs RCB IPL 2021 Match 19: Ravindra Jadeja ने Harshal Patel च्या एका ओव्हरमध्ये केला 5 षटकारांचा वर्षाव, युनिव्हर्स बॉसच्या विक्रमाची केली बरोबरी)
सुपर किंग्सने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कलची जोडी सलामीला उतरली. पण शानदार सुरुवातीनंतर कुरने आरसीबी संघाला पहिला धक्का देत विराटला तंबूत पाठवलं. त्यानंतर, ठाकूरने सलामीवीर पडीक्कलला 34 धावांवर माघारी धाडलं. चेन्नईने नियमित अंतराने आरसीबीच्या विकेट घेत संघाला आणले. वॉशिंग्टन सुंदर 7, डॅनियल ख्रिस्टियन 1, तर एबी डिव्हिलियर्स 4 धावच करू शकला. फलंदाजीने चमकदार कामगिरी केलेल्या जडेजाची फिरकी देखील तितकीच घातक सिद्ध झाली. शिवाय, त्याने पुन्हा एकदा आपल्या उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आणि ख्रिस्चनना धावबाद करत स्वस्तात माघारी धाडलं. दरम्यान, आजच्या सामन्यातील विजयामुळे चेन्नईने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
यापूर्वी, जाडेजाने 20 व्या ओव्हरमध्ये 37 धावा फटकावल्या ज्यामुळे चेन्नईने बेंगलोरला विजयासाठी 192 धावांचं तगडं आव्हान दिलं. जाडेजाने 20 व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर एकूण 5 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि नो-बॉल अशा एकूण 37 धावा चोपल्या.