रिषभ पंत (Photo Credit: PTI)

CSK vs DC IPL 2021 Match 2: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल (IPL) 14 च्या सुरुवातीपूर्वीच टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी आवृत्तीसाठी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. दिल्ली कॅपिटल्स आज एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरोधात यंदाच्या मोसमाची सुरुवात करत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या दुसऱ्या आयपीएल सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच दिल्लीचा कर्णधार पंत स्पर्धेच्या इतिहासातील 5वा युवा कर्णधार (IPL 5th Youngest Captain) ठरला आहे. रिषभला वयाच्या 23 व्या वर्षी दिल्लीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अनुभवाचा अभाव असूनही स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे सारख्या अनुभवी खेळाडूंचे नेतृत्व करण्यासाठी पंत पहिली निवड होता. लक्षात घेण्यासारखे म्हणजे संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 23 वर्षे आणि 4 महिन्यांचा असताना दिल्लीचे नेतृत्व केलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा सर्वांत तरुण कर्णधार आहे. (CSK vs DC IPL 2021 Match 2: रिषभ पंतचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ‘या’ खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश)

आयपीएल इतिहासात सर्वाधिक तरुण कर्णधाराचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराटला 22 वर्ष आणि 6 महिन्यांचा असताना कर्णधार घोषित केलं होतं. त्यांनतर, स्टिव्ह स्मिथला 22 वर्ष आणि 11 महिन्यांचा असताना कप्तानी करण्याची संधी मिळाली होती. आयपीएलमधील तिसरा युवा कर्णधार सुरेश रैना आहे जो 23 वर्ष आणि 3 महिन्यांचा असताना पहिल्यांदा कर्णधार बनला होता. आणि आता पंत देखील या कर्णधारांच्या एलिट यादीत सामील झाला आहे. दुसरीकडे, पंतकडे आता सर्वात कमी वयात आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माने वयाच्या 26 वर्ष 27 दिवसांचा असताना कर्णधार म्हणून पहिले आयपीएल जेतेपद पटकावलं होतं. जर पंतने आपल्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सला पहिले आयपीएल विजेतेपद जिंकून दिले तर तो रोहित शर्माचा हा विक्रम मोडेल.

विशेष म्हणजे 2017 मध्ये पंतने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते तर आयपीएलमध्ये मुंबईचे नेतृत्व करण्यापूर्वी रोहितकडे टी-20 कर्णधारपदाचा अनुभव नव्हता. आणि आता तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनला असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.