अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मोठी कारवाई करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेला, कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीची ही एक मोठी कारवाई आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मिडियावर मिहिले, 'माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!'

ते पुढे म्हणतात, 'माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.'

(हेही वाचा: रोहित पवारांना मोठा झटका; ED ने जप्त केली बारामती ऍग्रोच्या साखर कारखान्यासह 50 कोटी रुपयांची मालमत्ता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)