देव तारी त्याला कोण मारी; प्रार्थना करताना व्हॅन अंगावरून जाऊनही महिला जिवंत, पहा व्हिडिओ
अपघातात वाचलेली महिला (Photo Credits: Viral Press)

‘देव तारी त्याला कोण मारी’, ‘देवाची करणी नारळात पाणी’ अशा अनेक म्हणी आपल्याकडे प्रचलीत आहेत. मात्र या म्हणींचा प्रत्यय देणारे एक उदाहरण नुकतेच घडले आहे. गुजरातमधील सुरत येथे एका 55 वर्षीय महिलेला एका मिनी व्हॅनने धडक देऊन, ती व्हॅन तिच्या अंगावरून जाऊनही ही महिला जिवंत आहे. आश्चर्य म्हणजे ही महिला यावेळी एका मंदिरासमोर उभी राहून देवाची प्रार्थना करीत होती. डोळे बंद करून प्रार्थना करीत असल्याने एक व्हॅन रिव्हर्समध्ये पाठीमागे येत आहे हे या महिलेच्या लक्षात आले नाही. मात्र या अपघातातून वाचलेली ही महिला अगदी सुखरूप आहे.

रमिला सोळंकी असे या महिलेचे नाव आहे. रविवारी एका मंदिरासमोर ही महिला येते. बाजूला चप्पल काढून, डोळे मिटून देवाच्या समोर हात जोडून उभी राहते. त्याचवेळी एका व्हॅनची धडक महिलेला बसते. फक्त धडकच नाही तर, ही महिला मागे उभी आहे याची काही कल्पना नसलेला ड्रायव्हर या महिलेच्या अंगावरून  व्हॅन चालवतो. अंगावर काटा उभा करणारे हे दृश्य आहे. मात्र पुढच्या क्षणीच ही महिला चक्क उठून उभी राहते आणि ती पूर्णपणे सुखरूप असते. ही देवाचीच कृपा नाही तर अजून काय आहे? या महिलेनेही, साई बाबांमुळेच आपला जीव वाचला असल्याचे सांगितले आहे.