पंतप्रधान मोदींच्या गीतावर गरबा नृत्य करताना तरुणी (छायाचित्र सैजन्य: एएनआय ट्विटर व्हिडिओ)

देशभरात नवरात्रोत्सव आनंदात सुरु आहे. दुर्गादेवीच्या पुजेसोबतच लोक दांडीया आणि गरब्याचा आनंदही लुटत आहेत. या गरबा नृत्याचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत. दरम्यान, गुजरातमधून एक गरबा नृत्याचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून स्वत: नरेंद्र मोदींनी तो व्हिडिओ आणि त्यातील मुलींचे कौतुक केले आहे. व्हिडिओत गरबा खेळणाऱ्या मुली दिव्यांग आहेत. त्या गाण्यावर डान्स करत आहे ते गाणेही स्वत: नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी लिहिले आहे.

मोदींनी काही वर्षापूर्वी लिहिलेल्या या गिताचे बोल आहेत 'घूमे ऐनो गरबो'. अर्पण फिल्मसने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. गरबा हे गुजरातचे लोकनृत्य आहे. आपल्याच गाण्यावर गरबा खेळणाऱ्या मुली पाहून पंतप्रधानांनीही त्या मुलींचे कौतुक केले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, 'हा व्हिडिओ पाहून मला प्रचंड आनंद झाला. या गीतात मुलींनी खऱ्या अर्थांनी प्राण आणले. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!'

'घूमे ऐनो गरबो' हे गाणे पंतप्रधान मोदींनी २०१२मध्ये लिहिले होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी हे अधूनमधून कविताही लिहित असतात. त्यांच्या अनेक कविता आणि पुस्तके प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मोदींच्या या गीतावर व्हिडिओ बनवताना शैलेश गोहिल आणि डॉ. बिंदू त्रिवेदी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.