उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी (Lakhimpur) शहरात राहणारी एक महिला एका विचित्र आजारपणाने त्रस्त आहे. ही महिला गेल्या दोन वर्षांपासून स्वतःचे केस खात आहे. ऐकायला फार विचित्र वाटेल मात्र हे सत्य आहे. जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅनवरून ही माहिती मिळाली आहे. डॉक्टरांनी या गोष्टीला ट्रायकोटिलोमॅनिया (Trichotillomania) नावाचा मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. या शहराच्या राहणाऱ्या या महिलेला पोटदुखी आणि इतर काही तक्रारी उद्भवल्याने रुग्णालयात दाखल केले गेले होते. रुग्णालयात ती नक्की कोणत्या गोष्टींनी त्रस्त आहे हे समजले नाही, त्यामुळे डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून घेतला. सीटी स्कॅनमध्ये जे आढळून आले ते पाहून डॉक्टरही हैराण झाले.
या महिलेच्या पोटात चक्क केसांचा मोठा गुंता आढळला. त्यानंतर ऑपरेशन करून या केसांना बाहेर काढले गेले. डॉक्टरांनी अशाप्रकारे केस खाणे हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे ऑपरेशननंतर ही महिला, मानसिक आजाराच्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. मानसोपचातज्ञ डॉ. अखिलेश शुक्ला यांनी सांगितले की, ट्रायकोटिलोमॅनिया हा केस पुलिंग डिसऑर्डर म्हणूनही ओळखले जातो. हा आजार एखाद्याच्या मानसिकतेत अडथळा आणू शकतो.
अनेक प्रयत्न करूनही हा मानसिक आजार कमी होण्याऐवजी वाढत जातो. यामध्ये रोग्याला वारंवार भुवया, डोके आणि शरीराच्या इतर भागांमधून केस खेचून ते खाण्यास भाग पाडले जाते. यामध्ये आपल्या डोक्यावरचे केस खाण्याने टक्कल पडणे यांसारख्या समस्या उद्भवतात, अस्वस्थता उद्भवते ज्यामुळे रोजची कामे करणेही अवघड होऊन बसते. हे नक्की का घडते? का मानसिक आजार का जडतो याचे कारण अद्याप सापडलेले नाही. यासाठी काही पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटक कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.