Elephants Eating Sugarcane Viral Video: हत्तीच्या कळपाने रस्त्यात ट्रक थांबवत केली ऊस खाण्यास सुरूवात; व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले, 'ही कर वसूल करण्याची योग्य पद्धत'
Elephants Eating Sugarcane (Photo Credits: Twitter)

Elephants Eating Sugarcane Viral Video: असं म्हटलं जातं की, हत्तींना समूहात राहायला आवडते. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर हत्तींच्या कळपाचे अनेक मनोरंजक व्हिडिओ पाहिले असतील. परंतु, आम्हाला खात्री आहे की, सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल. या व्हिडिओमध्ये हत्तींचे कुटुंब (Elephants Family) उसाचा ट्रक (Sugarcane Truck) रस्त्यावर थांबवून त्यातून ऊस काढून तो खात आहेत. (Elephants Eating Sugarcane) या सर्व हत्तींनी बऱ्याचवेळ ऊसाचा ट्रक रोखून धरला आणि त्यातील ऊस खाणं चालूचं ठेवलं. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना आयएफएस सुशांत नंदा यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'सर्वात सभ्य कर संग्रहण करणारे. ते आपल्यावाट्याचे देय भाग घेत आहेत. दक्षिण भारतात कुठेतरी हत्तीचे कळप ऊसाचा कर वसूल करतात.' सुशांत नंदा यांनी 1 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. आतापर्यंत हा व्हिडिओ 17 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून यातील एकाने हत्तीने योग्यरित्या कर वसूल केल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - Watch Ghost Videos: तुम्ही रात्री ऐकटे झोपता का? तर 'हे' भितीदायक व्हिडिओ पाहिल्यानंतर चुकूनही होणार नाही अंधारात झोपण्याची हिम्मत)

दरम्यान, सुमारे 27 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक हत्ती, हत्तीण आणि त्यांचे दोन मुलं ट्रकसमोर उभे आहेत. ट्रक थांबविल्यानंतर हत्ती त्यातून ऊस काढून रस्त्यावर ठेवतो. त्यानंतर हत्तीचे कुटुंब रस्त्यावरुन ऊस उचलून तो खाण्यास सुरुवात करतात. हा सर्व प्रकार ट्रकमधील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.