ठाणे: वर्तकनगर येथील गृहसंकुलात मगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

ठाणे (Thane) येथील वर्तकनगर (Vartak Nagar) येथील वेदांत गृहसंकुलात मगर आढळून आल्याने तेथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या प्रकारामुळे नागरिकांनी तातडीने वन्यजीवनप्रेमींना याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पोहचून आढळलेल्या मगरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र मध्यरात्रीचे पाच तास उलटूनसुद्धा मगर न सापडल्याने नागरिक अधिक चिंता व्यक्त करत होते.

वेदांत संकुलातील बी-4 इमारतीच्या एका कठड्याजवळ मगरीची शेपटी मध्यरात्रीच्या वेळी दिसून आली. यामुळे तेथील पदाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढत नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला. संकुलाच्या पाठच्या बाजूला एक नाला असून तो पावसामुळे भरुन वाहत होता. तर येऊर येथील जंगलातील मगर या नाल्यातून संकुलात आल्याची शक्यता वन्यजीवनप्रेमींनी व्यक्त केली.(वडोदरा: मुसळधार पावसामुळे मगरींची लोकवस्तीत धाव, कुत्र्यावर केला हल्ला Watch Video)

या मगरीच्या प्रकारामुळे संकुलातील नागरिकांनी त्यांची आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन काढलेल्या पत्राकातून करण्यात आले आहे. तसेच आढलेली मगर ही नाल्यातून येऊन पुन्हा तेथूनच गेली असल्याचे वन्यजीवनप्रेमींकडून नागरिकांनाा सांगण्यात आले आहे. तर गेल्या महिन्यात चिपळून येथे सुद्धा पुराच्या पाण्यातून मगर लोकवस्तीत गटारातून ती वाहत आल्याचे नागरिकांना दिसून आले होते. त्यानंतर वनाधिकाऱ्यांना मोठ्या शर्थीने तिला पकडण्यात यश आले होते.