Viral WhatsApp post on coronavirus jokes (Photo Credits: PIB)

Fact Check: सध्या व्हाट्सअॅप (WhatsApp) कोरोना संदर्भातील विविध मेसेज व्हायरल होत आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये (Viral Post) असा दावा करण्यात आला आहे की, कोणीही कोरोना संदर्भातील जोक एखाद्या ग्रुपवर शेअर केला तर त्या ग्रुप अॅडमिनवर कारवाई करण्यात येईल. तसेच ग्रुप अॅडमिन आणि ग्रुप मेंबर्सवर कलम 68, 140 आणि 188 नुसार कारवाई करण्यात येईल. याशिवाय या व्हायरल मॅसेजमध्ये ग्रुप अॅडमिनला दोन दिवसांसाठी ग्रुप बंद ठेवण्यासही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या व्हायरल मॅसेजमध्ये पुढील प्रमाणे मजकूर देण्यात आला होता. 'ग्रुप अॅडमिनला विनंती आहे की, त्याने 2 दिवसांसाठी ग्रुप बंद ठेवावा. अन्यथा पोलीस अॅडमिन आणि ग्रुप मेंबर्स विरोधात कलम 68, 140 आणि 188 नुसार कारवाई करू शकतात. चुकून कोणीही कोरोना संदर्भात जोक शेअर केला तर ग्रुपमधील सर्वांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.' परंतु, प्रेस ब्यूरो ऑफ इंडिया (PIB) द्वारा करण्यात आलेल्या फॅक्ट चेकमध्ये ही पोस्ट निराधार आणि फेक असल्याचं समोर आलं आहे. (हेही वाचा - Fact Check: दिवे लावल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य काय?)

पीआईबीने या व्हायरल पोस्टविषयी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. PIB ने व्हायरल होणाऱ्या या मेसेजमागील सत्यता तपासली असून या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ही निव्वळ अफवा असून त्यामुळे अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन PIB ने केले आहे. हा मॅसेज चुकीचा असून सरकारकडून असे कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याचेही PIB ने म्हटले आहे.