PIB Fact Check. (Photo Credit: Twitter/@PIBFactCheck)

संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढा देत आहे. त्यासाठी देश तब्बल 21 दिवस लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. सर्व देशवासियांनी आज रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती लावून, टॉर्च किंवा मोबाईल टॉर्च पेटवून कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. मोदींच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, "नासाच्या संशोधनानुसार, कोरोना व्हायरस उष्ण तापमानात जिवंत राहत नाही. त्यामुळे 130 कोटी लोकांनी एकत्र दिवे लावल्यास तापमान 9 अंशाने वाढेल. त्यामुळे 5 एप्रिल रोजी रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी कोरोना व्हायरस नष्ट होईल." (Fact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते? WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा)

PIB ने व्हायरल होणाऱ्या या मेसेजमागील सत्यता तपासली असून या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ही निव्वळ अफवा असून त्यामुळे अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन PIB ने केले आहे. या गंभीर संकटात एकात्मता आणि आत्मविश्वास दाखवण्यासाठी मोदींनी दिवे लावण्याचे आवाहन केले आहे.

PIB Fact Check:

यापूर्वी जनात कर्फ्यू दिनी टाळ्या, थाळ्या वाजवण्याची संकल्पना मोदींनी मांडली होती. तेव्हा देखील टाळ्या वाजवल्याने कोरोना विषाणू मरतात अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र ती देखील अफवाच होती. कोरोना व्हायरसची दहशत वाढायला लागल्यानंतर त्या संबंधित अफवांना देखील उधाण आले आहे. अनेक फेक मेसेजेस, खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिंतेत भर टाकणाऱ्या या अफवांकडे दुर्लक्ष करणेच हितावह ठरेल. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेजेसची सत्यता तपासल्याशिवाय कोणताही मेसेज फॉरर्वड करु नका.