Viral Video: काश्मीरच्या बर्फाळ रस्त्यावर धावणारा टांगा पाहून लोकांनी केली स्वर्गाशी तुलना, पहा व्हिडिओ
Tanga running on the icy roads of Kashmir (PC - X/@MohsinK05058545)

Viral Video: जम्मू-काश्मीर (Kashmir) मध्ये सलग तीन दिवस पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. शनिवार आणि रविवारी काश्मीरसह राज्यातील पर्वत आणि काही मैदानी भागात हिमवर्षाव झाला. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग (Heaven) म्हटले जाते, निसर्गसौंदर्याने भरलेल्या काश्मीरच्या सौंदर्यात हिवाळ्यात बर्फवृष्टी (Snowfall) झाली की आणखीनच भर पडते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हिमवृष्टीने काश्मीरमध्ये चैतन्य आले असून खोऱ्यांमध्ये सर्वत्र बर्फाची पांढरी चादर दिसून येत आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरला जात आहेत. दरम्यान, दरीतून एक सुंदर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक टांगा बर्फाच्या पांढऱ्या चादरीत बर्फाच्छादित रस्त्यावर धावताना दिसत आहे. हे सुंदर दृश्य पाहून लोक त्याची तुलना स्वर्गाशी करत आहेत.

हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरमधील एका गावातला आहे. जेथे बर्फाळ रस्त्यावर टांगा धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ X वर @MohsinK05058545 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनद्वारे सांगितले आहे की, तो त्याच्या गावापासून इस्लामाबाद असा घोडागाडीने प्रवास करत आहे. या व्यक्तीने त्याच्या मूळ गावी रामपोरा येथून अनंतनाग शहरात जात असताना हा व्हिडिओ शूट केला. (हेही वाचा - Tilefish Viral Video: सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या माशाचा व्हिडिओ व्हायरल, पहा)

पहा व्हिडिओ -

तथापी, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये बर्फाच्छादित रस्ते आणि बागा दिसत आहेत. हे सुंदर दृश्य पाहून नेटीझन्स त्याची तुलना स्वर्गाशी करत आहेत. सर्वत्र पसरलेल्या बर्फाच्या शुभ्र चादरीतून मार्गक्रमण करत टांगा धावत आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे आजूबाजूला बर्फाचा दाट थर साचला आहे. बर्फवृष्टीमुळे येथे तीन इंच जाडीचा थर पसरला आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.