अलिगडमधील (Aligarh) बन्नादेवी परिसरातील खैर रोडवरील सुंदर ज्वेलर्स येथे तीन दुचाकीस्वारांनी, अगदी फिल्म स्टाईलमध्ये सोन्याची चोरी (Robbery) केली आहे. या लोकांनी पिस्तूल दाखवून तब्बल 35 लाखाचे सोने व साधारण 40 हजार रुपयांची रोकड लुटली. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागात घबराट पसरली आहे. दुकानात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या चोरीची माहिती मिळतात जिल्ह्यातील उच्च पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. एसपी सिटी आणि एसपी क्राइमच्या नेतृत्वात चोरांना ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या चोरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सारसौल चौकाजवळ खैर बायपास रोडवर सुंदर ज्वेलर्सचे दुकान आहे. शुक्रवारी (11 सप्टेंबर 2020) दुपारी 3 च्या सुमारास तीन दुचाकीस्वार या ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. दुकानातील कर्मचारी आणि तेथील ग्राहकांना काही समजायच्या आधीच त्यातील एकाने बंदुकीचा धाक दाखवून समोरील टेबलावरील सोने उचलून आपल्या साथीदाराला दिला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने रोकड काढून ती देखील आपल्या साथीदाराला दिली. अशाप्रकारे या चोरट्यांनी दुकानातून 35 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपयांची रोकड लुटली.
पहा व्हिडिओ -
उत्तर प्रदेश के अलीगढ़ जनपद में ज्वेलरी शॉप को दिनदहाड़े कैसे लूट लिया जाता है, देखिये... https://t.co/CPi10LaB2R pic.twitter.com/Zv9yyBeYIB
— Sachin Gupta | सचिन गुप्ता (@sachingupta787) September 11, 2020
अगदी काही सेकंदामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, चोराने बंदूक दाखवल्यावर दुकानातील सर्व लोक स्तब्ध झाले आहेत व काहीही हालचाल न करता त्यांनी चोरांना चोरी करू दिली. दरम्यान, याआधी बाडमेर शहरातील नेहरू नगर येथे असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सोन्याची चोरी केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्या संध्याकाळी दुकानदाराने सामान पॅक करण्यास सुरूवात केली तेव्हा दागिने कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने दुकानातील सीसीटीव्ही पाहिल्यावर दोन संशयित दागिने चोरताना दिसले. गुरुवारी दुकानदाराने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.