व्हर्जिनियात सापडला दोन तोंडाचा साप; सोशल मीडियावर युजर्सच्या तोंडून अगंबाई... अरेच्छा..!
व्हर्जिनियातील दोन तोंडांचा साप (Photo Credits: facebook/john.kleopfer)

साप हा केवळ शब्द जरी उच्चारला तरी, अनेकांच्या अंगावर सर्रकन काटा येतो. तज्ज्ञांच्या मते हा तर एक निरुपद्रवी आणि प्रचंड घाबरट प्राणी. जो पर्यंत त्याला कोणी डिवचत नाही तोपर्यंत तो कोणाला इजा करत नाही. पण, साप चावल्याने माणूस दगावल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे बहुदा बरीच मंडळी सापाला वचकून असावीत. अगदी बोली भाषेतही सापाचा अनेकदा उद्धार केला जातो. तो तर, विषारी सापच आहे. आमुक एखादा माणूस दोन तोंडी सापच रे. सापासारखा वळवळू नको वैगेरे वैगेरे. असो. इतके सगळे सापपूराण सांगण्याचे कारण असे की, सोशल मीडियावर एका सापाने चांगलाच कल्ला केला आहे. ज्याला पाहून युजर्सच्या तोंडू अंगबाई, अरेच्चा, अरे बाप रे...! असे उद्गार निघत आहेत.

...तर मंडळी हा साप चक्क दोन तोंडाचा आहे. दोन तोंडाचा म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेनसारखे दोन्ही बाजूला दोन तोंडं (इंजिन) असलेला नव्हे. तर, या सापाला एकच शरीर पण, एकाच बाजूला दोन तोंडं आहेत. त्यामुळे या सापाचा आकार इंग्रजी अक्षर 'Y'सारखा दिसतो. खरेतर ऐकायला ही गोष्ट तशी विचित्र. पण, प्रत्यक्षात घडली आहे खरी. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, दोन तोंडे असलेला हा साप अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे सापडला आहे. एका घरकाम करणाऱ्या माणसाला घराच्या परिसरात हा साप आढळला. हा विचित्र साप पाहिल्यावर त्याने सापाशी संबंधीत काम करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला.

दरम्यान, सर्पतज्ज्ञ जे.डी. क्लिओफर यांनी या सापाबद्दल माहिती देताना सांगितले की, अशा प्रकारचे साप दुर्मिळ अतात. त्यामुळे त्यांचे जन्माला येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते. तसेच ,अशा सापांना पर्यावरणाशी जोडून घेता येत नाही. जगत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ते अल्पावधीत मृत्यू पावतात. असे असले तरी, या सापाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी त्याला वाईल्डलाईफ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.