#MatKarForward: सारा अली खान, विराट कोहली, आयुष्यमान खुराना आणि कृति सेनन यांच्यासह PIB Fact Check चा टिकटॉक व्हिडिओ; फेक न्यूज फॉरवर्ड न करण्याचे नागरिकांना आवाहन
#MatKarForward (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचे जागतिक संकट संपूर्ण देशासमोर उभे ठाकले असताना सोशल मीडियावर अनेक प्रकराची माहिती समोर येत आहे. कोरोना संबंधित माहिती, व्हिडिओ, फोटोज, मेसेजेसची सध्या चलती आहे. मात्र ती माहिती खरी असल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. परंतु, अनेकदा तथ्यता न तपासता खोटी माहिती, फेक न्यूज फॉरवर्ड केल्या जातात. त्यामुळे नागरिकांच्या अस्वस्थतेत भर पडते. त्यांचा अधिक गोंधळ उडतो. त्यामुळे अनेकदा PIB Fact Check कडून व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता तपासली जावून नागरिकांपर्यंत योग्य ती माहिती पोहचवली जाते. तसंच नागरिकांनी व्हॉट्सअॅप, इतर मेसेजिंग अॅपवरील माहिती फॉरवर्ड करु नये असेही आवाहन वारंवार करण्यात आले आहे. आता PIB Fact Check ने सारा अली खान (Sara Ali Khan), विराट कोहली (Virat Kohli), आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) आणि कृति सेनन (Kriti Sanon) यांच्यासह एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. यात खोटी माहिती शेअर करु नका असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

यात सेलिब्रिटी कोरोना व्हायरसच्या संकटात फॉरवर्ड होणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्रित आले आहेत. हा टिकटॉक व्हिडिओ पीआयबी फॅक्ट चेकने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पीआयबीने लिहिले की, "फेक न्यूज शेअर करण्याचा अजून एक आजार पसरला आहे." तसंच जबाबदार रहा. माहितीची सत्यता तपासल्याशिवाय फॉरवर्ड करु नका. असा मोलाचा संदेशही PIB कडून देण्यात आला आहे.

अफवा, फेक न्यूज, खोटी माहिती तसंच ज्या माहितीमुळे इतरांचे नुकसान होईल अशी माहिती फॉरवर्ड करु नका. कारण असे केल्याने तुम्ही, तुमच्यासह इतर आणि पर्यायाने देश सुरक्षित राहिल असा संदेश सेलिब्रिटी या व्हिडिओतून देत आहेत.

पहा व्हिडिओ:

कोरोना व्हायरसचे संकट परतवून लावण्यासाठी फेक न्यूजचा अडसर दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नका आणि महत्त्वाचं म्हणजे ती फॉरवर्ड करु नका. आपले सेलिब्रिटी देखील या व्हिडिओतून आपल्याला तोच संदेश देत आहेत.