Noida: उत्तर प्रदेशात सध्या विचित्र चोरीच्या घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये एक टोळी बंद घरांचे कुलूप तोडून घरात भजे व इतर वस्तू बनवून खाऊन लाखो रुपयांचा ऐवज पळवतात. या टोळीने आता पोलिसांनाही हैराण केले आहे. पोलिसांकडून त्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात घुसून या टोळीचे लोक पानही खातात. गेल्या २४ तासांत या टोळीने अर्धा डझनहून अधिक घरांना लक्ष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर 82 कॉम्प्लेक्समध्ये ही टोळी सक्रिय आहे. चोरी करण्यासोबतच या टोळीचे लोक घरामध्ये अन्न शिजवण्यातही तासनतास घालवतात. या टोळीने नोएडा सेक्टर 82 च्या परिसरात एकाच दिवसात सहा ते सात घरात घुसून चोरी केली आहे. घरात शिरल्यावर हे लोक आनंदाने पेटपूजा करतात आणि लाखोंचा माल पळवतात.
सातत्याने वाढणाऱ्या घटनांनंतर नोएडा पोलीस कारवाई करत असून, मध्य नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त हृदेश कथेरिया यांनी माहिती देताना सांगितले की, या गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. कॅम्पसमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. या टोळीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. नोएडामध्ये चोर आधुनिक उपकरणांचा पुरेपूर वापर करत असल्याचे दिसून आले आहे. या टोळीमुळे सध्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.