मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आज नागरिकांना सायबर सेफ्टी (Cyber Safety) बाबत एक अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियामधून नागरिकांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती चोरण्यापासून आर्थिक डल्ला मारण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र याबाबत प्रत्येकाने सावध राहण्याचा सल्ला मुंबई पोलिसांनी दिला आहे. समाज माध्यमांवर अनेकदा बनावट खात्याच्या माध्यमातून पैसे मागितल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे फसवणूकीला बळी पडू नका. पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा. असं मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये समान छायाचित्र वापरून बनावट ऑनलाईन खातं बनवणार्यांपासून सावध रहा असे मुंबई पोलिसांनी ट्वीट केले आहे.
माहिती आणि प्रोफाईल फोटो वापरून बनावट अकाऊंट्स बनवली जातात. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्टांना रिक्वेस्ट पाठवल्या जातात. दरम्यान त्यानंतर पैशांची मागणी केली जाते. यामधूनच आर्थिक फसवणूक केली जाते असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई पोलिस ट्वीट
समान छायाचित्र वापरून बनावट ऑनलाईन खाते बनवणाऱ्यांपासून सावधान!
समाज माध्यमांवर अनेकदा बनावट खात्याच्या माध्यमातून पैसे मागण्याचा प्रकार घडल्याचे लक्षात आले आहे. या फसवणुकीला बळी पडू नका, पैसे पाठवण्याआधी खात्री करा.#CyberSafety
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 20, 2021
दरम्यान मागील काही दिवसांत सायबर क्राईमची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संकटाच्या भीतीचा वापर करत अनेकांनी खोट्या बातम्या पसवल्या आहे. अफवांचे पेव फूटल्याने अनेकांची भीतीचा गैरउपयोग करत लूट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एनडीटीव्हीच्या अॅंकर निधी राजदान देखील ऑनलाईन फिशिंगच्या बळी पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अमेरिकेत एका प्रसिद्ध विद्यापीठात नोकरीच्य संधीचं आमिष दाखवत त्यांची वैयक्तिक माहिती, बॅंक डीटेल्स घेतल्याचं त्यांनी पोस्ट द्वारा सांगितलं आहे.