Maharashtra Police Tweet| Photo Credits: Twitter/Maharashtra Police

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक वाढणारी कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या सामान्यांच्या मनात धडकी भरवणारी आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सध्या कोविड19 लसीकरण सुरू आहे पण त्यामुळे सामन्यांनी बेफिकीर होऊ नये आवाहन करताना प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार मास्क घालणं, हात स्वच्छ धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही त्रिसुत्री पाळण्यास सांगितलं जात आहे. दरम्यान आता सोशल मीडीयातूनही पोलिस नागरिकांना याबाबत सजग राहण्याचं आवाहन करत आहेत. आज महाराष्ट्र पोलिसांनी 'अण्णा नाईक' यांची दहशत दाखवत नागरिकांना कोविड 19 नियमावलीचं पालन करून कोरोनाला हरवण्याचं आवाहन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर खास ट्वीट देखील करण्यात आले आहे.

मास्क लावणे, अंतर राखणे, हात स्वच्छ करणे. 'तीन' गोष्टी लक्षात ठेवूया कोरोनाचा 'खेळ' संपवूया! या कॅप्शनसह 'अण्णा नाईक' या पात्राचा फोटो मास्क वापरतास ना? या असा प्रश्न विचारत शेअर करण्यात आला आहे. दरम्यान झी मराठी वरील 'रात्रीस खेळ चाले' या गुढमालिकेतील 'अण्णा नाईक' हे लोकप्रिय पात्र आहे. त्याची भेदक नजर रसिकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरली आहे. आता या मालिकेचा तिसरा सीझन रसिकांच्या भेटीला आहे. आणि त्याआधीच 'अण्णा नाईल' नागरिकांना मास्क वापरताय ना? हा प्रश्न विचारताना दिसत आहेत.

महाराष्ट्र पोलिस ट्वीट

महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वी 'बबड्या' या लोकप्रिय पात्राच्या माध्यमातूनही नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केले होते. सध्या राज्यात काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने संचारबंदी, लॉकडाऊन लावला जात आहे. पण नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी मास्क वापरण्याचे पुन्हा पुन्हा आवाहन केले जात आहे. Use A Mask: बबड्या मास्क लावतो, तो खरचं सुधारलायं; महाराष्ट्र पोलिसांचं सुचक ट्विट; Watch Photo.

दरम्यान काल राज्यात 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे. देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्ण महाराष्ट्रात आहे.