लग्नसोहळ्यात पाहुण्यांसाठी खास Maggi Counter; व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Maggi Counter at wedding (Photo Credits: Twitter)

तुम्ही खवय्ये असा किंवा नसा. पण मॅगी (Maggi) ला नाही म्हणणारे थोडेच असतील. अडीअडचणीला, घाईगडबडीत, खूप भूक लागल्यानंतर अशा अनेक प्रसंगात मॅगी पोटाचा आधार होते. पण लग्नसमारंभात मॅगी? पहिल्यांदाच ऐकताय ना? पण हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एका लग्नसोहळ्यातील मॅगी कऊंटरची जोरदार चर्चा आहे. या काऊंटरचा फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे. सौम्या लखानी नावाच्या एका तरुणीने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तिच्या कझिनच्या लग्नसोहळ्यात चक्क मॅगी काऊंटर पाहायला मिळाले. त्यामुळेच मॅगीप्रेमींपैकी एक असलेल्या सौम्याला प्रचंड आनंद झाला आणि त्यामुळे कझिनवरचे प्रेम अधिकच उफाळून आले.

तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "विचारपूर्वक करुन प्लॅनिंग करत लग्नाच्या ठिकाणी मॅगी काऊंटर ठेवल्यामुळे मला माझ्या भावाबद्दल जरा जास्तच प्रेम वाटू लागलंय." या फोटोत तुम्ही पाहू शकाल, मॅग्गीचे खूप सारे पॅकेट्स दिसत आहेत. स्टोव्हवर एका पॅनमध्ये मॅगी बनत आहे आणि गरमागरम मॅगी सर्व्ह करण्यासाठी तिथे कर्मचारीही उभा आहे.

पहा फोटो:

या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रतिक्रीया येत आहेत. तर या भन्नाट कल्पनेचे कौतुकही केले जात आहे. लग्न नेमकं कुठे होतं? कॅटरर्स कोण? असे प्रश्नही विचारले जात आहेत. दरम्यान, मॅगी काऊंटरवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी गर्दी केल्याचे सौम्याने म्हटले आहे.

लग्नसोहळ्यात खाण्याची धम्माल असते. विविध पदार्थांची रेलचेल असते. तुम्हाला हवं तितकं तुम्ही अगदी मनसोक्त खाऊ शकता. त्यामुळे अनेकजण लग्नसमारंभाना जातात. पाहुण्यांचा खरा आनंद लग्नसोहळ्यातील पदार्थांमध्ये लपलेला असतो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. यापूर्वी थाय, क्वान्टिन्टेंटल, चॅट, इटालियन अशा पदार्थांनी सजलेल्या लग्नाच्या मेन्यू मध्ये मॅगीनेही जागा पटकावली आहे. यापुढे याचे अनुकरण केले जाईल, यात शंकाच नाही.