Lok Sabha Elections 2019: मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval Lok Sabha Constituency ) हा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या उमेदवारीमुळे जोरदार चर्चेत आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध असतानाही पार्थ पवार आपल्या उमेदवारीवर ठाम होते. आजोबा शरद पवार (Sharad Pawar), वडील अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असलेल्या रक्ताच्या नात्यामुळे पार्थ पवार यांची उमेदवारी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरली आहे. असे असतानाच पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना मावळ लोकसभा मतदारसंघात आपले पहिले भाषण वाचून दाखवले. अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार (First speech of Parth Pawar) यांची चांगलीच धांदल उडाली. भाषण करताना उडालेली घाबरगुंडी, इंग्रजी वळणाचे मराठीत शब्दोच्चार, आणि थरथरलेला आवाज ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये राहिली.
पार्थ पवार यांनी आपले पहिले भाषण कागदावर लिहून आणले होते. कागदावर लिहिलेले वाचतानाही पार्थ पवार यांचा गोंधळ झाला. त्यामुळे उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेणे तर सोडाच पण, त्यांना स्वत:लाही शब्दांवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे कागदावर लिहून आणलेलेही पार्थ पवार यशस्वीपणे वाचू शकले नाही. अनेकदा त्यांची वाक्ये मध्येच तुटत होती. मध्ये इग्रजी वळणाने मराठी शब्दांचे उच्चारण केले जात होते.
पार्थ अजित पवार यांचे पहिलेच भाषण
दरम्यान, आपल्या भाषणातून पार्थ पवार यांनी सरकारवर टीका केली. शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी मुद्दे सोडवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप करतानाच पवार यांनी मोदी सरकारच्या काळात भष्टाचार झाल्याचे देखील पार्थ पवार यांनी सांगितले. पार्थ पवार यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी जाहीर व्यासपिठावरुन पार्थ पवार बोलत होते. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)
पार्थ अजित पवार यांचे पहिलेच भाषण
पार्थ पवार भाषण करत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. गोंधळ उडाल्यामुळे पार्थ पवार यांचे भाषण रंगले नाही. केवळ तीन मिनिटांत त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. आपण चुकत आहे हे लक्षात येताच त्यांनी उपस्थितांची माफी देखील मागितली. माझे पहिलेच भाषण असल्यामुळे माझ्याकडून बोलताना चुका होत आहेत असे सांगत पार्थ पवार यांनी प्रसंगावधान दाखविण्याटचा प्रयत्न केला. परंतू, त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतो आहे.