भारतामध्ये पुन्हा लागू होणार Lockdown? 29 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी 2021 पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची अफवा, जाणून घ्या सत्य
Another Coronavirus Lockdown in India? (Photo Credits: Twitter)

सध्या देशात पुन्हा कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. याआधी कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे मार्च 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली होती व आताही तशीच परिस्थिती उद्भवते की काय अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. कोविड-19 साथीच्या काळात, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक फेक बातम्या आणि अफवा पसरविण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता नेटिझन्स असा दावा करीत आहेत की 29 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी 2021 या काळात भारतात तीन दिवस लॉकडाऊन लागू होईल.

सध्या सोशल मिडियावर एक संदेश फिरत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ’29 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी 2021 पर्यंत तीन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात सर्वकाही बंद राहणार आहे. त्यानुसार आपला किराणा माल व इतर गोष्टींची तरतूद करा.’ हा संदेश अनेकांनी शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

मात्र जर का तुम्ही संदेश व्यवस्थित वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की हा संदेश पूर्णतः खोटा आहे. 2021 मध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा आहे. फक्त लीप वर्षातच फेब्रुवारी महिन्यात 28 औवजी 29 दिवस असतात. म्हणूनच 29 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी दरम्यान आणखी एक लॉकडाउन असूच शकत नाही आणि म्हणूनच या व्हायरल मेसेजमधील दावा खोटा असल्याचे सिद्ध होते. (हेही वाचा: फेक वेबसाईट कडून 2 लाखापर्यंत ‘Pradhan Mantri Yojana Loan’अंतर्गत कर्ज मिळत असल्याचा दावा; जाणून घ्या या वायरल न्यूज मागील सत्य)

दरम्यान याआधी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, ‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,’ अशी माहिती होती.