प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) सध्या जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पाहता, लोक खबरदारीचे अनेक उपाय अवलंबताना दिसत आहेत. मात्र आजूबाजूच्या काही घटना पाहता, ही भीती किती हास्यास्पद पातळीवर पोहोचली आहे हे जाणवते. अमेरिकेमधील एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रयत्नात, त्या चक्क मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याची घटना घडली आहे. मात्र त्यानंतर या सर्व उत्तर पत्रिका जाळून खाक झाल्या. एका विद्यार्थिनीने या गोष्टीची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

एमिली पेरेझ असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती लिहिते, ‘आमच्या विद्यापीठामधील एका प्राध्यापकाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठामधील एका शिक्षकाच्या मनात कोरोना विषाणूबद्दल भीती होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकाकांचेही त्यांना निर्जंतुकीकरण करायचे होते म्हणून त्यांनी चक्क उत्तर पत्रिका मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्या. मात्र त्यानंतर या सर्व उत्तर पत्रिका जळून गेल्या.’

गरम वातावरणात कोरोनाचे विषाणू मरतात ही गोष्ट या प्राध्यापकांना माहित होती. त्यामुळेच त्यांनी हा मार्ग अवलंबला. सध्या हे ट्वीट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. काही वापरकर्त्यांनी या प्राध्यापकाला उत्तर पत्रिका तपासण्याचे सोपे प्रतिबंधात्मक मार्ग सुचविले आहे. तर अनेकांनी प्रोफेसरच्या सॅनिटायटेशनच्या कल्पनेची थट्टा केली आहे. उत्तर पत्रिका लिहिण्यापासून ते त्या तपासण्यासाठी येण्यापर्यंतच्या तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये, कोरोना विषाणू मरू शकतो, इतकी साधी गोष्ट या प्रोफेसरच्या लक्षात आली नसल्याबद्दल अनेकांनी या प्राध्यापकाच्या बुद्धीची कीव केली आहे.

याआधी चीनमध्ये एका महिलेने असेच आपले £300 रुपये मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, जगभरात सुमारे दोन लाख लोकांना या प्राणघातक कोरोना विषाणूची लागण झाली असून, सुमारे 7, 900 लोक मरण पावले आहेत. अमेरिकेसारख्या विकसित देशात या संसर्गजन्य आजाराने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या 105 वर पोहचली आहे. अमेरिकेत आता हा विषाणू देशातील सर्व 50 राज्यात पसरला आहे.