पुण्यात घरकाम (Housemaid) करणाऱ्या गीतामावशी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. गीतामावशी यांचे व्हिजिटिंग कार्ड (Visiting Card) हा या चर्चेचा प्रमुख विषय. त्याचे व्हिजिटींग कार्ड पाहू गेल्या काही दिवसांत कामासाठी त्यांना इतके फोन कॉल (Phone Calls) आले आहेत की, अखेर या मावशींना अखेर आपला फोन स्विच ऑफ करुन ठेवावा लागला आहे. विशेष म्हणजे घरकाम करण्यासाठी त्यांना केवळ पुणे, मुंबई येथूनच नव्हे तर, चक्क दिल्ली, हरियाणा आणि भारतातील इतर राज्यांतूनही फोन आले आहेत. गीतामावशी यांचे खरे नाव गीता काळे (Geeta Kale) असे आहे. तर धनश्री शिंदे या त्यांच्या व्हिजिटिंग कार्डच्या मुख्य सूत्रधार आहेत. जाणून घ्या काय आहे गीतामावशींची कहाणी.
गीता काळे उर्फ गीतामावशी या एक घरकाम करणाऱ्या सर्वसामान्य महिला. कष्ट करावे आणि हिमतीने आपला संसार रेटावा हा त्यांचा खाक्या. बावधान येथे राहणाऱ्या धनश्री शिंदे यांच्याकडे गीतामावशी गेली प्रदीर्घ काळ घरकाम करतात. धनश्री यांच्याप्रमाणे त्या इतरही काही घरांमध्ये घरकाम करतात. दरम्यान, एकेदिवशी काम करत असताना धनश्री यांना त्या काहीशा चिंतीत वाटल्या. त्यांनी कारण जाणून घेतले. यावर गीतामावशींनी सांगितले की, आपल्याप्रमाणेच त्या इतरही काही घरांमध्ये काम करतात. परंतू, काही कारणांमुळे त्या घरांमधील काम बंद झाले आहे. त्यामुळे आता माझे महिन्यांचे आर्थिक बजेट हालणार. पैशांचा खड्डा पडणार. सर्व सोंग आणता येते पैशांचे नाही. पैशांचा मेळ कसा घालायचा. नवे काम मिळाल्याशिवाय पैशांचा मेळ लागणार नाही. नवे काम मिळायला काही दिवस नक्कीच जाणार.
धनश्री यांना गीतामावशी यांची चिंता कळली. त्यांची चिंता दूर करण्यासाठी धनश्री यांनी गीतामावशींना सांगितले की, काळजी करु नका. आपण आपले व्हिजिटिंग कार्ड काढू. ते शेजारच्या वॉचमनला देऊ आपण ही व्हिजिटिंग कार्ड इतरही काही ठिकाणी देऊ. ज्यांना आवश्यकता असतील ते लोक आपल्याशी संपर्क साधतील. आणि मग इथूनच सुरु झाला गीतामावशी यांच्या व्हिजिटिंग कार्डचा प्रवास.. (हेही वाचा, गलेलठ्ठ पगार देणाऱ्या टॉप 7 कंपन्या; नोकरी करणाऱ्याची हमखास चांदी)
धनश्री शिंदे यांची फेसबुक पोस्ट
ठरल्या प्रमाणे धनश्री यांनी गीतामावशी यांचे व्हिजिटिंग कार्ड तयार केले. ते प्रिंट होऊनही आले. धनश्री यांनी व्हिजिटिंग कार्डच्या गठ्ठातली पाच-सहा कार्ड काढून स्वत:कडे घेतली बाकीची गीतामावशींना दिली. या कार्डमधील एक कार्ड धनश्री यांनी आपल्या मित्रालाही व्हाट्सअॅपवरुन शेअर केल. त्यानंतर अवघ्या 24 तसात चमत्कार घडला. त्यांचे व्हिजिटिंग कार्ड देशभर आणि जगभर प्रसिद्ध झाले. गीतामावशी यांना पुणे, मुंबई, दिल्ली, हरियाणा असे कोठूण कोठून फोन येऊ लागले. फोन इतके वाढले की, त्यांना आपला मोबाईल स्विच ऑफ करुन ठेवावा लागला.
इतके सारे फोन पाहून आश्चर्य वाटल्याने तुम्ही ही व्हिजिटिंग कार्ड कोठे दिली होती असे धनश्री यांनी गीतामावशी यांना विचारले. यावर त्यांनी कोठेच नाही इतकेच उत्तर दिले. मग धनश्री यांनी आपल्या मित्राला विचारले. यावर त्याने सांगितले की, व्हिजिटिंग कार्ड ही कल्पना मला प्रचंड आवडली. म्हणून मी ते सोशल मीडियावर पोस्ट केले. धनश्री यांना इतके फोन का आले याचे कारण कळले.
दरम्यान, गीतामावशी यांना बावधानमध्येच काम मिळाले आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांची कामाची गरज संपली आहे. पण, असे असले तरी त्यांना येणारे फोन कॉल्स सुरुच आहेत. येणाऱ्या कॉल्सची संख्या इतकी प्रचंड आहे की, आजूनही त्यांनी आपला फोन स्विच ऑफच ठेवला आहे. सध्यातरी आपणास पुरेसे काम मिळाले आहे, असे त्या खुशीने सांगतात. त्यांच्या व्हिजिटिंग कार्ड प्रयोगामुळे स्मार्ट लोकांना नोकरी नक्कीच आहे, अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागले आहेत.