गुजरात: मालकाच्या आकस्मित मृत्यूने दु:खी असलेल्या उंटाने सोडले अन्न-पाणी
Representational Image |(Photo Credits: Twitter)

प्राण्यांमध्येही माणूसकी असते, असे आपण अनेकदा म्हणतो, ऐकतो. पण त्याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. गुजरात (Gujarat) येथील कच्छ (Kutch) परिसरात एका उंटाने मालकाच्या मृत्यूनंतर खाणे-पिणे सोडून दिले आहे. शिवराज गढवी, असे या मृत मालकाचे नाव असून कच्छ बॉर्डरवर ड्युडीवर असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.शिवराज गढवी हे कच्छ येथील सिंघोडी गावातील रहिवासी होते. ते रोज बॉर्डरवर ड्युटीसाठी ये-जा करताना उंटाला सोबत नेत.

24 जानेवारी रोजी 56 वर्षांचे गढवी यांनी पिंगलेश्वर येथे पेट्रोलिंगची ड्युटी दिली होती. त्यासाठी ते सकाळी साडेनऊ वाजता आपल्या उंटासोबत पिंगलेश्वर येथे पोहचले. त्यानंतर त्यांनी उंटाला खायला दिले आणि काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना भुजच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मात्र तिथे नेईपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालवली. त्यानंतर त्यांना वाटेतच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

इंस्पेक्टर गढवी यांच्या अचानक झालेला मृत्यू संपूर्ण गावाला चटका लावून गेला. ड्युटीवर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या सन्मानात त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले. मात्र या प्रकरणाचा सर्वाधिक धक्का उंटाला बसला असून त्याने अन्न पाण्याचा त्याग केला आहे. उंटाला ठीक करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एका इंस्पेक्टरने यांनी सांगितले.