चर्चगेट-विरार लोकलमध्ये खुलेआम धूम्रपान, मद्यपान करून धिंगाणा (Video)
virar local viral video Photo Credit :Twitter

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. रोज चाकरमान्यांना अनेक कडू गोड प्रसंगाचा सामना करत प्रवास करावा लागतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये काही मंडळी रेल्वेच्या डब्ब्यात दारात ठाण मांडून चक्क मद्यप्राशन करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शनिवारी रात्री चर्चगेट-विरार लोकलमध्ये तीन प्रवासी लगेजच्या डब्यात बसून सिगारेट पित, मद्यसेवन करत प्रवास करतानाचा व्हिडीओ एका प्रवाशाने शूट केला आहे. रात्री 10.18 च्या चर्चगेट – विरार लोकलमधील हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या प्रकारात सहभागी असणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुंबई लोकलमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. तसेच एखादी व्यक्ती आढळल्यास तिच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. विरार लोकलमध्ये यापूर्वी धक्काबुक्कीचे अनेक प्रसंग पुढे आले आहेत. मात्र आता पश्चिम रेल्वेमध्ये अशाप्रकारे वाढणारे जुगाऱ्यांचे अड्डे, मद्यपान, धूम्रपान करून हुज्जत घालण्याच्या प्रकारामुळे इत्तर प्रवाशांचेही प्राण धोक्यात आले आहेत.