आपल्या सर्वांनाच माहित आहे की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजकारणात येण्याआधी रिक्षा चालक म्हणून काम केले आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेक माध्यमांनी ‘रिक्षा चालक ते मुख्यमंत्री’ अशा मथळ्याच्या बातम्याही केल्या होत्या. आता याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रिक्षासोबत उभी असलेली दिसत आहे. यावर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 25 वर्षांपूर्वीचा हा फोटो असल्याचा दावा केला जात आहे.
या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती दाढी-मिशावाले रिक्षाचालक आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, त्यांच्या रिक्षाची पूजा होत आहे. तिला हार-फुलांनी सजवले आहे. या व्यक्तीमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बरेच साम्य असल्याने ते एकनाथ शिंदेच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता हा फोटो एकनाथ शिंदेंचा नाही हे स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक बाबा कांबळे यांचा हा फोटो आहे. त्यांनी 1997 साली हा फोटो काढला होता.
श्रावण महिन्यात रिक्षाची पूजा करतानाचा पिंपरीच्या रातराणी रिक्षा स्टॅन्डमधील हा फोटो आहे. 1997 साली पिंपरी चौकात रातराणी रिक्षा थांबा होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आपल्याला असंख्य फोन आल्याचे बाबा कांबळे यांनी सरकारनामाला सांगितले. ते म्हणाले ‘माझ्या व शिंदेंच्या जुन्या फोटोत साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गैरसमज झाला असावा.’ (हेही वाचा: राज्यात प्लास्टिक बंदी झाली आणखी कठोर; शिंदे-फडणवीस सरकारने घातली 'अशा' उत्पादनांवर बंदी)
दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील असले तरी, त्यांचे शिक्षण ठाण्यात झाले. त्यानंतर त्यांनी ठाण्यातच रिक्षा चालवायला सुरुवात केली. पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांना दाढी आहे. म्हणूनच आता फक्त या दाढीमुळे रविवारपासून बाबा कांबळे यांचा फोटो एकनाथ शिंदेंचा फोटो म्हणून व्हायरल झाला.