Fact Check: 3 महिन्यांसाठी Free Internet सुविधा देण्याची भारत सरकारची घोषणा? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारत सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी लढत आहे. अशावेळी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीचा शिक्षणावर फार मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशात विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचे काम सुरु आहे, मात्र अजूनही अनेक ठिकाणी स्मार्टफोन, इंटरनेट यांची कमतरता असल्याची दिसून येत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत सोशल मिडियावर अनेक खोटे मेसेजेस व्हायरल होत आहेत. आताही व्हॉट्सअ‍ॅपवर असाच एक मेसेज अनेकांनी शेअर केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की भारत सरकार 10 कोटी वापरकर्त्यांना 3 महिन्यांसाठी विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरवित आहे. यावर पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, ‘मुलांच्या शिक्षणासाठी भारत सरकार सर्व भारतीयांना मोफत इंटरनेट पुरवीत आहे. ही सुविधा 3 महिन्यांसाठी दिली जाणार आहे. जर तुमच्याकडे जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचे सिमकार्ड असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.’ या संदेशामध्ये एक लिंकही दिली आहे व म्हटले आहे की, या मोफत इंटरनेट सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

यामध्ये पुढे म्हटले आहे की, ही सुविधा फक्त 29 जून 2021 पर्यंतच घेता येणार आहे व आतापर्यंत 95185 लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे की, हा मेसेज व ही लिंक खोटी आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध रहा. कोणत्याही खोट्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची नोंदणी करू नका व एसएमएस, ई मेल किंवा इतर तत्सम माध्यमातून शेअर केलेल्या लिंकवर क्लिक करू नका. (हेही वाचा: Covid-19 लस घेतल्यावर हातामध्ये वीज निर्माण होते? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमागील सत्य)

पीआयबी फॅक्ट चेकने शेवटी म्हटले आहे की, अशा खोट्या लिंक अथवा वेबसाईटच्या माध्यमातून चोर तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, आता असेच पेटीएम कॅशबॅकच्या (Paytm Cashback) नावाखाली लोकांना सायबर फ्रॉडमध्ये फसवले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.