Snake | Image Used For Representational Purpose| Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये पेट्रोलपंपावर बाटलीमध्ये पेट्रोल न दिल्याच्या रागामध्ये एका व्यक्तीने 3 साप चक्क पेट्रोल चालकाच्या कॅबिनमध्ये सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना केबिनच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोश्ल मीडियामध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान सर्पमित्रांना याबाबतची माहिती कळवताच त्यांनी सापांनी सुटका केली आहे.

काल (13 जुलै) दिवशी बुलढाणा मध्ये मलकापूर रोड येथील चौधरी पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. दुपारच्या 4 च्या सुमारास एक व्यक्ती केबिनच्या दारात आला आणि त्याने साप सोडले. सध्या बुलढाणा मध्ये 7 जुलै पासून 21जुलै दरम्यान कोरोना व्हायरस लॉकडाऊन पाळला जात आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केले आहे. तसेच पेट्रोलपंपावर देखील निर्बंध आहेत. मात्र ग्राहक व्यक्तीला पेट्रोल मिळणार नाही असे सांगताच त्याने रागाच्या भरात 3 साप सोडले. यामुळे कॅबिन आणि पेट्रोलपंपावर काही काळ गडबड-गोंधळाची परिस्थिती होती.

सध्या बुलढाणा मध्ये कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. काल रात्रीपर्यंत 492 एकूण कोरोनाबाधित रूग्ण बुलढाण्यात आढळले आहेत. त्यापैकी 270 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 205 जणांवर उपचार सुरू आहेत. आता बुलढाण्यामध्ये कोरोना रूग्णांचे लवकर निदान करण्यासाठी प्रयोगशाळेला देखील परवानगी देण्यात आली आहे.