आरती साहा Google Doodle: भारतीय जलतरणपटू Arati Saha यांच्या 80 व्या जन्मदिनी गुगलने साकारले खास डूडल!
Arati Saha Google Doodle (Photo Credits: Google)

दिवंगत जलतरणपटू आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आरती साहा (Arati Saha) यांचा आज 80 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डूडल साकारून आरती साहा यांना अभिवादन केले आहे. आरती साहा यांचा जन्म 24 सप्टेंबर, 1940 साली कोलकाता येथे झाला होता. लहानपणापासून त्यांना खेळाची आवड होती. अवघ्या 5 वर्षांची असताना आरती यांनी स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. फ्रान्समधील केप ग्रिझ नॅझ ते इंग्लंडमधील सॅण्डगेटदरम्यानचे 42 मैलांचे अंतर पोहून पार करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या. 29 सप्टेंबर 1959 मध्ये त्यांनी ही कामगिरी बजावली. त्या भारतीय जलततरणपटू मिहिर सेन यांच्यापासून प्रभावित झाल्या होत्या, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

आरती साहा यांच्या स्मरणार्थ गुगलने साकारले खास डूडल:

आजचे डूडल कोलकाता येथील आर्टिस्ट लावन्या नायडू यांनी साकारले आहे. या डूडलद्वारे देशातील अनेक लोकांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे नायडू यांना वाटते.

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आरती साहा:

करिअरच्या सुरुवातीलाच आरती साहा यांनी अनेक मेडल्स मिळवले. त्यांनी 1949 साली राष्ट्रीय स्तरावर एक विक्रम रचला आणि 1951 साली पश्चिम बंगाल स्टेट मीट मध्ये डॉली नजीर यांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. तसंच 1952 मध्ये त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले.

सहा वर्ष सराव केल्यानंतर त्या 24 जुलै 1959 रोजी इंग्लंडला पोहचल्या. इंग्लिश खाडी पोहण्याच्या पहिल्याच प्रयत्न विघ्न आलं. आरती यांची पायलेट बोट तासभर उशीरा आल्याने त्यांना उशीरा सुरुवात करावी लागली. मात्र सुमद्रातील नैसर्गिक परिस्थिती तोपर्यंत बरीच बदलली होती. त्यामुळे त्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी पाच मैलांनंतर माघार घ्यावी लागली. मात्र 29 सप्टेंबर 1959 साली आरती साहा यांचा इंग्लिश खाडी पोहण्याचा दुसरा प्रयत्न यशस्वी ठरला. त्यांनी सुमारे 16 तास 20 मिनिटांत 42 मैलांचे अंतर पार केले आणि किनाऱ्यावरुन भारताचा झेंडा फडकवला. 1960 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 23 ऑगस्ट 1994 साली कोलकाता येथे आरती यांचे निधन झाले.