टेकऑफ करताना तुटलं विमानाच चाक; पहा या घटनेचा थरारक व्हिडिओ
Wheel fell off an Air plane (PC - Tom Twitter Handle)

विमान प्रवास करणं सर्वानाचं आवडतं. आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु, आपला विमान प्रवास सुरक्षित होणं हेही तितकेच महत्त्वाचं आहे. आपण दररोज विमान अपघातासंदर्भात अनेक घटना ऐकत असतो. आज इराणची राजधानी तेहरान (Tehran) मध्ये मोठा विमान अपघात झाला. त्यामुळे या विमातून प्रवास करणाऱ्या 180 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमान टेकऑफ करत असताना त्याचं चाक तुटलं. या अवस्थेत विमानाने उड्डाण केलं. हा सर्व प्रकार विमानात बसलेल्या प्रवाशांने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ एअर कॅनडा एक्सप्रेस फ्लाइट (Air Canada Express Flight) चा असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये विमान टेकऑफ करताना विमानाच्या एका चाकातून ठिणग्या उडताना पाहायला मिळत आहेत. हे चाक शेवटी विमानापासून वेगळं झालेलंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! दारु पिऊन तरुणाने केला सापासोबत नागीण डान्स; पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ)

या विमानातील प्रवाशाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'टॉम' असं या प्रवाशाचं नाव आहे. 'मी सध्या ज्या विमानात आहे, त्या विमानाची चाकं तुटली आहेत. 2020 ची सुरुवात चांगली झाली,' असं कॅप्शन या प्रवाशांनी व्हिडिओला दिलं आहे. टॉमने शेअर केलेल्या या व्हिडिओला अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत. यात प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.