मध्य रेल्वेने (Central Railway) एप्रिल ते जून 2023 या कालावधीत भंगार (Scrap) साहित्याच्या विल्हेवाटीच्या माध्यमातून 81.64 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याद्वारे रेल्वेने त्यांचे 36.06% प्रमाणबद्ध उद्दिष्ट ओलांडले आहे. जून 2023 मध्ये भंगार विक्रीची रक्कम 36.35 कोटी रुपये होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांच्या मते, भंगार विक्रीचे वार्षिक लक्ष्य 300 कोटी रुपये ठेवले आहे.
हे यश रेल्वेच्या ‘झिरो स्क्रॅप मिशन’ साध्य करण्यासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांचे आणि सरकारी ई मार्केट (GeM) ऑनलाइन खरेदी प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीचे परिणाम आहे. शून्य स्क्रॅप मिशन साध्य करण्यासाठी मध्य रेल्वेच्या उत्कृष्ट कामगिरीने 2023 मध्ये प्रतिष्ठित पं. गोविंद बल्लभ पंत शिल्डसाठी 22 पैकी 10 पॅरामीटर्समध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. (हेही वाचा: Pune: पुण्यात बस चालक व वाहकांच्या अरेरावीला बसणार आळा; थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करा आणि मिळवा बक्षीस, जाणून घ्या सविस्तर)
मध्य रेल्वेच्या सर्व पाच विभागांमध्ये, मुंबई (माटुंगा वर्कशॉप), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर अशा विविध ठिकाणी भंगार विक्री झाली आहे. विकल्या गेलेल्या भंगार वस्तूंमध्ये इएमयू कोच, आयसीएफ कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर विविध वस्तूंचा समावेश होतो. गव्हर्नमेंट ई मार्केट (GeM) ऑनलाइन खरेदी प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे संपूर्ण भारतातील विक्रेत्यांसाठी समान संधी सुनिश्चित करून ही विक्री प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक झाली आहे.